नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याच्या उद्देशाने दमदार पाऊल टाकले आहे. टॉमस बर्डीचवर मात करत जोकोव्हिचने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. दुसरीकडे डेव्हिड फेररने स्पेनच्याच निकोलस अल्माग्रोला नमवत उपांत्य फेरीत धडक मारली. या दोघांमध्येच अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी मुकाबला रंगणार आहे. महिलांमध्ये मारिया शारापोव्हा आणि लि ना या दोघींनी उपांत्य फेरीत आगेकूच केली.
जोकोव्हिचने चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डीचवर ६-१, ४-६, ६-१, ६-४ अशी मात करत उपांत्य फेरीत स्थान पटकावले. याआधीच्या सामन्यात स्टॅनिलॉस वॉरविन्काविरुद्ध जोकोव्हिचला विजयासाठी पाच तास आणि पाच सेट एवढा संघर्ष करावा लागला होता. या पाश्र्वभूमीवर बर्डीच जोकोव्हिचसमोरील आव्हान कठीण करणार का, ही उत्सुकता टेनिसरसिकांमध्ये आहे. मात्र जोकोव्हिचने गतविजेत्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करत विजय मिळवला. जोकोव्हिचने पहिला सेट सहजतेने जिंकला. मात्र दुसरा सेट बर्डीचने जिंकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु जोकोव्हिचने नैपुण्याने खेळ करत पुढील दोन सेटसह सामन्यावर कब्जा केला. संघर्षपूर्ण विजय मिळवत उपांत्य फेरी गाठणाऱ्या डेव्हिड फेररचा जोकोव्हिचला उपांत्य फेरीत सामना करावा लागणार आहे.
दोन सेट गमावलेल्या डेव्हिड फेररने भन्नाट पुनरागमन करत निकोलस अल्माग्रोचे आव्हान संपुष्टात आणले. फेररने ३ तास आणि ४४ मिनिटांच्या संघर्षांनंतर हा सामना ४-६, ४-६, ७-५, ७-६ (७-४), ६-२ असा जिंकला.
‘मी हा सामना जिंकलो हे आश्चर्यच आहे. निकोलसला जिंकण्याची अनेक संधी होत्या. दोन सेट गमावल्यानंतर मी प्रत्येक गुणासाठी तडफेने खेळ करत सामना जिंकला’, असे फेररने विजयानंतर सांगितले.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मारिया शारापोव्हाने रशियाच्याच इकाटेरिना माकारोव्हाचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. आतापर्यंतच्या पाच सामन्यांत शारापोव्हाने केवळ नऊ गुण गमावले आहेत. आतापर्यंत स्पर्धेत तुलनेने अनुनभवी खेळाडूंचे आव्हान सहजपणे मोडून काढणाऱ्या शारापोव्हासमोर उपांत्य फेरीत मात्र चीनच्या लि ना हिचे तगडे आव्हान असणार आहे.
सलग १३ सामन्यांत विजय मिळवणाऱ्या पोलंडच्या अ‍ॅग्निेझेस्का रडवानस्काला नमवत लि हिने उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले. लि नाने रडवानस्काचा ७-५, ६-३ असा पराभव केला.
‘रडवानस्का चिवट खेळाडू आहे. तिच्याविरुद्धचा मुकाबला अतिशय कठीण होता. सर्व फटके तिच्या भात्यात आहेत आणि ती ते अचूकतेने वापरते. प्रत्येक गुणासाठी संघर्ष करावा लागतो. तिला थोडीशीही संधी दिल्यास सामना गमवावा लागू शकतो’, असे लि ना हिने विजयानंतर सांगितले.
भूपती-पेट्रोव्हा उपांत्यपूर्व फेरीत
भारताच्या महेश भूपती याने रशियाच्या नादिया पेट्रोव्हा हिच्या साथीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या जोडीने कॅटरिना श्रेबोत्निक (स्लोवाकिया) व निनाद झिमोन्जिक (सर्बिया) यांना ३-६, ६-२, १०-५ असे पराभूत केले.  

पेस-व्हेसनिनाचे आव्हान संपुष्टात
द्वितीय मानांकित लिएण्डर पेस आणि एलिना व्हेसनिना यांचे मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या बिगरमानांकित मॅथ्यू इब्देन आणि जार्मिला गॅजडोसोव्हा या जोडीने पेस-व्हेसनिनाचा ६-३, ६-२ असा ५८ मिनिटांत धक्कादायक पराभव केला.