ब्राझीलमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेदरम्यान गोलरेषा तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून चार प्रकारच्या यंत्रणा अंतिम निवडीसाठी शर्यतीत आहेत.
‘‘जून महिन्यात होणाऱ्या कॉन्फडरेशन चषक स्पर्धेसाठी आणि २०१४च्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी आपली यंत्रणा निवडण्यात यावी, यासाठी संबंधित कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. गोलरेषा तंत्रज्ञान बनविणाऱ्या कंपन्यांनी मार्च महिन्यात होणाऱ्या निरीक्षणासाठी उपस्थित राहावे. चारपैकी एका यंत्रणेची निवड एप्रिल महिन्यात केली जाईल,’’ असे ‘फिफा’च्या पत्रकात म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेत २०१०मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या फ्रँक लॅम्पर्डचा गोल नाकारण्यात आल्यानंतर गोलरेषेवरील निर्णयासंबंधात पंचांच्या मदतीसाठी तंत्रज्ञान असावे, यावर फिफा अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी होकार दर्शवला. नियम बनविणाऱ्या फिफाच्या ‘आयएफएबी’ समितीने गेल्या वर्षी दोन यंत्रणांची अद्ययावत चाचणी घेतली. त्यात हॉक-आय आणि गोलरेफ ही दोन तंत्रज्ञान यशस्वी ठरली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या क्लब विश्वचषक स्पर्धेत गोलरेफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या दोन तंत्रज्ञानासह आणखी दोन कंपन्या फिफा विश्वचषकाच्या शर्यतीत आहेत.
‘‘जर्मनीच्या दोन यंत्रणांनी सर्व चाचण्या पार पाडल्या असून त्या वापरासाठी तयार आहेत. टेनिस आणि क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारे हॉक-आय हे तंत्रज्ञान इंग्लंडच्या सोनीकॉर्प कंपनीच्या मालकीचे आहे. तसेच गोलरेफ हे तंत्रज्ञान डेन्मार्कच्या कंपनीने बनवले आहे,’’ असेही फिफाने म्हटले आहे. २०१०च्या विश्वचषकापूर्वी ब्लाटर यांचा पंचांच्या निर्णयात अडथळा आणणाऱ्या तंत्रज्ञानाला कडाडून विरोध होता. पण लॅम्पर्डचा गोल पंचांनी नाकारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली.
गोलरेषा तंत्रज्ञान काय आहे?
चेंडूने गोलरेषा पार केली आहे की नाही, हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या साहाय्याने स्पष्ट होणार असून पंचांना आपला निर्णय सुनावण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. चेंडूमध्ये मॅग्नेटिक सेन्सॉर किंवा इलेक्ट्रॉनिक चीप बसवण्यात येणार असून चेंडूने गोलरेषा पार केल्यास, एका सेकंदात पंचांच्या मनगटावरील घडाळ्यावर गोल झाल्याचे स्पष्ट होईल. पंचांची जागा हे तंत्रज्ञान घेणार नसून पंचांना आपला अंतिम निर्णय सुनावण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत होईल.