प्रो-कबड्डी लीगच्या यशाबाबत आम्ही साशंक होतो; परंतु या लीगला मिळालेला प्रतिसाद हा कौतुकास्पद आहे. टीव्ही प्रक्षेपणाच्या आकडेवारीत कबड्डीने अनेक खेळांना मागे टाकले आहे. कबड्डी हा खेळ आता थेट क्रिकेटशी स्पर्धा करू लागला आहे. प्रो-कबड्डीने खेळात क्रांती घडवली आहे, असे मत आंतरराष्ट्रीय आणि आशियाई हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांनी व्यक्त केले. प्रो-कबड्डी स्पध्रेच्या यशाबद्दल आणि खेळाच्या वाटचालीबाबत गेहलोत यांच्याशी केलेली खास बातचीत-
*प्रो-कबड्डीच्या यशाबद्दल काय सांगाल?
कबड्डी लीग आयोजित करण्याचे फार आधीपासून आम्ही ठरवले होते. फक्त चांगल्या पुरस्कर्त्यांच्या आम्ही शोधात होतो. मग चारू शर्मा यांच्या पुढाकाराने आनंद महिंद्रा यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यानंतर या स्पध्रेबाबत झालेल्या करारात आठ फ्रेंचायझींचा समावेश असलेली प्रो-कबड्डी लीग घेण्याचे निश्चित करण्यात आले; परंतु ही लीग इतकी यशस्वी होईल, याबाबत संयोजक मशाल स्पोर्ट्स, फ्रेंचायझी आणि प्रशासक मंडळीही साशंक होतो; परंतु संपूर्ण देशातील जनतेने प्रो-कबड्डीला उत्तम प्रतिसाद देऊन एका उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवले.
*प्रो-कबड्डीची लोकप्रियता कशी वाढत गेली?
गेल्या महिन्याभराचा प्रो-कबड्डीचा प्रवास स्वप्नवत असाच होता. टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या आकडय़ांनी फिफा विश्वचषकापासून अनेक स्पर्धाचे आकडे मोडीत काढले आहेत. आता कबड्डी हा खेळ थेट क्रिकेटशी स्पर्धा करू लागला आहे. भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यांऐवजी क्रीडारसिक कबड्डी पाहणे पसंत करीत आहेत. आधी महिलावर्ग टीव्हीवर ‘जोधा-अकबर’ मालिका पाहण्यासाठी उत्सुक असायचा, पण आता त्याही प्रो-कबड्डी पाहू लागल्या आहेत. पाकिस्तानी संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमधील खेळाडूंनाही प्रो-कबड्डी आवडू लागले आहे. अनेक परदेशी संघांकडून या खेळाविषयी विचारणा होऊ लागली आहे. त्यामुळे प्रो-कबड्डीने खेळात क्रांती घडवली आहे, असे मी म्हणेन.
*तीन वर्षांपूर्वी आलेली कबड्डी प्रीमियर लीग (केपीएल) अयशस्वी ठरली, परंतु प्रो-कबड्डी यशस्वी ठरली. या दोन लीगच्या यशापयशामधील फरक काय सांगाल?
मी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. या काळात विविध खेळांसाठी अनेक देशांचे दौरे केले. कबड्डीच्या प्रचार आणि प्रसाराचा ध्यास मी बाळगला होता. २०११मध्ये केपीएलचा प्रयोग आम्ही केला होता; परंतु अनेक व्यावसायिक कारणांमुळे तो अयशस्वी ठरला. पण आम्ही तिथेच थांबलो नाही. फ्रेंचायझींवर आधारित स्पर्धा अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. हे स्वप्न साकारले आहे, याचा मला अतिशय आनंद होतो आहे.
*प्रो-कबड्डीमधील नव्या नियमांना कसा प्रतिसाद मिळतो आहे?
कबड्डीमधील थरार वाढवणाऱ्या नव्या नियमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे नियम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राबवण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आशियाई क्रीडा स्पध्रेदरम्यान आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाची बैठक होईल. त्यावेळी नव्या नियमांचा आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्ये अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये चर्चेत येऊ शकेल.
*कबड्डीच्या ऑलिम्पिक वाटचालीबद्दल काय सांगाल?
प्रो-कबड्डीने देशविदेशांमध्ये या खेळाला लोकप्रिय केले आहे. त्यामुळे आमची ऑलिम्पिकची वाटचाल अधिक सशक्त झाली आहे. आशियाई क्रीडा स्पध्रेत कबड्डीला महत्त्वपूर्ण स्थान असते. याचप्रमाणे सध्या ३५ देश आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाच्या छत्राखाली आले आहेत. त्यामुळे ऑलिम्पिकचे स्वप्न आता फारसे दूर नाही.
कबड्डीची आता थेट क्रिकेटशी स्पर्धा!
प्रो-कबड्डी लीगच्या यशाबाबत आम्ही साशंक होतो; परंतु या लीगला मिळालेला प्रतिसाद हा कौतुकास्पद आहे. टीव्ही प्रक्षेपणाच्या आकडेवारीत कबड्डीने अनेक खेळांना मागे टाकले आहे.
First published on: 01-09-2014 at 04:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now kabaddi to compete with cricket