एखादा खेळाडू खेळत असताना त्याच्या खेळाबद्दल, शैलीबद्दल, खेळीबद्दल निर्णयाबद्दल टीका करणे हे टीकाकारांचे कामच असते, पण एकदा का निवृत्ती घेतली की टीकाकारही संपतात, असे म्हटले जाते. पण क्रिकेटमध्ये फार कमी वेळा टीकेचे लक्ष्य ठरलेला ‘दी वॉल’ राहुल द्रविड क्रिकेटमधून निवृत्त झालेला असला तरी त्याच्यावर दोन टीकाकार अजूनही टीका करतच आहेत आणि हे दोन टीकाकार आहेत त्याचीच दोन मुलं.
आपल्या देशात क्रिकेट हा खेळ एवढा आपलासा वाटतो की, कोणीही टीकाकार बनतो. माझी दोन्ही मुलं माझी टीकाकार आहेत. मी खेळत असताना ती नेहमी मला सांगायची की, आम्हाला तुझ्याकडून संयमी फलंदाजी पाहायची नाही, तर गेलसारखी तडाखेबंद फलंदाजी पाहायची आहे. आता क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यावरही त्यांची कोणत्या ना कोणत्या बाबतीत माझ्यावर टीका होतच असते, असे द्रविडने सांगितले.
निवृत्तीनंतरच्या आयुष्याबद्दल द्रविडला विचारले असता तो म्हणाला, आता मला कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देता येत आहे आणि त्यामुळे मी आनंदित आहे. मुलांचा अभ्यास घेता येतो, त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यात आनंद मिळतो. यापुढे गमतीने द्रविड पुढे म्हणाला की, निवृत्ती घेतल्यामुळेच मला आता कांदे, टॉमेटो, साखर यांचे भाव माहिती झाले आहेत.

Story img Loader