निवड चाचणीत पिंकी जांग्राकडून पराभूत झाल्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेला मुकलेली भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोम आता आशियाई स्पर्धेच्या तयारीला लागली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठीची निवड चाचणी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असली तरी मी कसून मेहनत घेत आहे. आता पूर्ण जोमाने मी कोर्टवर उतरले आहे. निवड चाचणीत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, असे पाच वेळा विश्वविजेती ठरलेली बॉक्सर मेरी कोम हिने सांगितले.
उषा इंटरनॅशनलतर्फे बुधवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मेरी कोम हिने पुन्हा एकदा भारतीय बॉक्सिंग संघटनेवर टीका केली. ‘‘सध्या महासंघाचा कारभार भोंगळ होत चालला आहे. अनेक युवा बॉक्सर्सना त्याची झळ बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर महासंघाच्या निवडणुका झाल्या तर ते खेळाडूंसाठी फायद्याचे ठरणार आहे. नवी कार्यकारिणी आल्यावर आश्वासक स्थिती निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. या निराशाजनक परिस्थितीनंतरही मी सरावावर लक्ष केंद्रित केले आहे.  देशाला अधिकाधिक पदके मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील,’’ असेही तिने सांगितले.

Story img Loader