जून-जुलै महिन्यात जागतिक क्रीडा क्षेत्रावर गारूड असेल ते  ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे. ही स्पर्धा संपताच भारतात ‘प्रो-कबड्डी’ची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. आठ संघांच्या सहभागानिशी २६ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या फ्रेंचायझी आधारित स्पध्रेची तयारी आता ऐन बहरात आली आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अभिनेता अभिषेक बच्चन याने जयपूरस्थित संघ आपण खरेदी केल्याची घोषणा केली. परंतु यासाठी त्याने किती किंमत मोजली ते मात्र गुलदस्त्यात आहे.
‘‘लहानपणी वडिलांमुळेच मला प्रथम कबड्डीची ओळख झाली. मी बालपणी हा खेळ खेळलोही आहे. परंतु आता अभिनेता म्हणून नव्हे, तर खेळाचा सच्चा चाहता म्हणून हा संघ मी खरेदी केला आहे. मला संयोजकांनी कबड्डीची ताजी चित्रणे दाखवली. त्यामुळे प्रभावित होऊन खेळाच्या उत्कर्षांसाठी मी हा निर्णय घेतला,’’ असे अभिषेक बच्चनने यावेळी सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘प्रो-कबड्डीच्या निमित्ताने येत्या काही काळात क्रिकेटपटूंप्रमाणेच कबड्डीपटूंनाही ओळख प्राप्त होईल. सर्वसामान्य मंडळीही त्यांना नावानिशी ओळखतील.’’

लवकरच महिलांसाठीही ‘प्रो-कबड्डी’
‘‘पुरुषांसाठी होणाऱ्या ‘प्रो-कबड्डी’च्या निमित्ताने आम्ही हे शिवधनुष्य पेलत आहोत. परंतु येत्या काही वर्षांत महिलांसाठीही अशा प्रकारे स्पर्धा घेण्याची आमची योजना आहे. परंतु सध्या ‘प्रो-कबड्डी’ स्पध्रेतील प्रत्येक सामन्याच्या दिवशी महिलांचा एक प्रदर्शनीय सामना खेळवण्यात येणार आहे,’’ असे आश्वासन ‘मशाल स्पोर्ट्स’चे व्यवस्थापकीय संचालक आणि क्रीडा समालोचक चारू शर्मा यांनी दिले.
सात संघांचे संघचालक निश्चित
उद्योगपती आनंद महिंद्रा आणि मशाल स्पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक चारू शर्मा यांच्या प्रयत्नांनी साकारणाऱ्या ‘प्रो-कबड्डी’ स्पध्रेत आठ शहरांचे संघ सहभागी होणार असून, प्रत्येक संघ घरच्या मैदानावर आणि प्रतिस्पध्र्याच्या मैदानावर असे सामने खेळतील. सध्या या स्पध्रेकरिता सात शहरांचे संघ निश्चित झाले असून, बंगळुरू संघाचे मालक लवकरच निश्चित होणार आहेत, असे सूत्रांकडून समजते.
‘प्रो-कबड्डी’चा लिलाव जूनमध्ये
‘प्रो-कबड्डी’ स्पध्रेचा लिलाव ७ ते १० जूनदरम्यान होणार आहे. या लिलावामध्ये ७२ भारतीय आणि २४ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यात पाकिस्तानसह अफगाणिस्तान, इराण, बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, इंडोनेशिया, इटली, जपान, नेपाळ, मलेशिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका, थायलंड आणि तुर्केमेनिस्तान या देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावासाठी खेळाडूंना भारतीय, परदेशी, ज्युनिअर आणि वाइल्ड कार्ड अशा विभागांमध्ये विभागण्यात आले आहे.
राजू भावसार, अशोक शिंदे समालोचकांच्या चमूत
‘प्रो-कबड्डी’ स्पध्रेचे स्टार स्पोर्ट्स क्रीडा वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, त्यांच्या समालोचकांच्या चमूत अर्जुन पुरस्कार विजेते भारताचे माजी कबड्डीपटू राजू भावसार आणि अशोक शिंदे यांचा समावेश आहे. ‘प्रो-कबड्डी’साठी सज्ज होणाऱ्या या कबड्डी समालोचन चमूला सध्या अभिनेते अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्या मार्गदर्शनाचे धडे मिळत आहेत.
शहर    संघमालक
जयपूर    – अभिषेक बच्चन, अभिनेता
मुंबई    – रॉनी स्क्रूवाला, युनिलेझर ग्रुप
कोलकाता – किशोर बियानी, फ्यूचर ग्रुप
पुणे –    उदय कोटक, कोटक महिंद्रा
दिल्ली – राणा कपूर, येस बँक
विशाखापट्टणम्    – कोर ग्रीन ग्रुप
चेन्नई – कलपाठी इन्व्हेस्टमेंट
बंगळुरू – निश्चित झालेले नाही

Story img Loader