भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत २८ वर्षांनी पुन्हा कुस्तीत सुवर्णपदक मिळवून दिल्याचा आनंद खूप वेगळा आहे. आता जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवित रिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित करण्याचेच माझ्यापुढे लक्ष्य आहे, असे आशियाई सुवर्णपदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त याने सांगितले.
‘‘जागतिक स्पर्धेचा अपवाद वगळता अन्य सर्व महत्त्वपूर्ण स्पर्धामध्ये मला पदक मिळाले आहे. त्यामुळे आता विश्वविजेतेपदावर मोहोर नोंदविण्यासाठी मी उत्सुक आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी होणार आहे. तेथील पदकाने माझा ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित होणार आहे. जागतिक स्पर्धेसाठी मला सराव करण्याची भरपूर संधी आहे. साहजिकच मी या सरावावर लक्ष केंद्रित करणार आहे,’’ असे योगेश्वर म्हणाला. योगेश्वर याने ऑलिम्पिकमध्ये यापूर्वी कांस्यपदक मिळविले आहे. राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धाप्रमाणेच त्याने इटलीमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही पदकांची कमाई केली आहे.
योगेश्वर हा ६५ किलो गटात भाग घेत आहे. या संदर्भात विचारले असता तो म्हणाला, ‘‘नवीन गट माझ्यासाठी खूप अनुकूल आहे. जागतिक स्तरावर या गटात फारसे तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्यामुळे मला रिओ येथे ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविण्याची हुकमी संधी आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत मी सर्व प्रतिस्पर्धी खेळाडूंना दोन मिनिटांमध्येच गारद केले आहे. अर्थात आशियाई स्पर्धेत मला तुल्यबळ लढतींना सामोरे जावे लागले होते. विशेषत: उत्तर कोरिया, चीन, ताजिकिस्तान आदी देशांमधील खेळाडूंविरुद्ध थोडेसे झुंजावे लागले. या सुवर्णपदकामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. ऑलिम्पिकमध्ये माझ्यापुढे युरोपियन व अमेरिकन मल्लांचे आव्हान असणार आहे.’’
योगेश्वर पुढे म्हणाला, ‘‘फ्रीस्टाईल विभागात भारताच्या अन्य खेळाडूंनी अपेक्षेइतकी कामगिरी केली नाही. किमान पाच पदकांची आम्हाला अपेक्षा होती. मात्र केवळ तीनच पदकांवर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये दोन पदकांची खात्री होती. त्यानुसारच आम्हाला पदके मिळाली.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा