भारतीय संघातील खेळाडूंचे शिकण्याचे दिवस संपले आहेत. आता त्यांनी परदेशातील मैदानावर प्रतिस्पर्धी संघाचे वीस बळी घेत कसोटी विजय मिळविला पाहिजे, असे भारतीय संघाचे संचालक  रवी शास्त्री यांनी सांगितले.
श्रीलंकेबरोबर कसोटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारी सुरुवात होत आहे. गेल्या दोन दशकांत भारताला श्रीलंकेत कसोटी विजय मिळविता आलेला नाही. १९९३ मध्ये भारताने तीन कसोटी सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली होती. शास्त्री यांनी सांगितले, कसोटी अनिर्णीत ठेवण्याच्या ध्येयापेक्षा सामनाजिंकण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. खेळाडूंनी परदेशात भरपूर सामने खेळले आहेत. त्यामुळे परदेशातील हवामान व खेळपट्टी याचा त्यांना पुरेसा अनुभव मिळाला आहे. या अनुभवाचा फायदा त्यांनी सामना जिंकण्यासाठी घेतला पाहिजे.
भारताचा कर्णधार विराट कोहली याने पाच गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे समर्थन करताना शास्त्री म्हणाले, कसोटीतील निर्णायक क्षणी पाचव्या गोलंदाजाचा उपयोग होतो. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कशी दाणादाण उडविली आहे. हे उदारहण समोर ठेवीत आमच्या गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी करण्याची आवश्यकता आहे.
लंकेच्या संघाविषयी शास्त्री म्हणाले, श्रीलंकेच्या संघात अनेक युवा चेहऱ्यांचा समावेश असला तरी त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडूंची कमतरता नाही. घरच्या खेळपट्टी व वातावरणाचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता आहे.
अंतिम अकरा खेळाडूंमध्ये रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांच्यापैकी कोणाला जास्त संधी आहे असे विचारले असता शास्त्री म्हणाले, रोहित याला जास्त संधी आहे. तो अतिशय आक्रमक व शैलीदार फलंदाज आहे. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर तो चौफेर फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे.