थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला पुन्हा एकदा जपानच्या नोझुमी ओकुहाराकडून पराभव स्विकारावा लागला. या स्पर्धेत सिंधूला उप-विजेतेपदावर समाधान मानावं लागलं, मात्र आगामी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेतही सिंधूला पुन्हा एकदा ओकुहाराचा सामना करावा लागू शकतो. ३० जुलैपासून चीनमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
दोन्ही खेळाडूंनी आपले पहिले सामने जिंकल्यास उपांत्यपूर्व फेरीत सिंधू आणि ओकुहाराचा सामना होण्याची शक्यता आहे. रविवारी झालेल्या थायलंड स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओकुहाराने सिंधूला सहज पराभूत केले होते. सिंधूला थेट दुसऱ्या फेरीत जाण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती सायना नेहवालपुढे तिसऱ्या फेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मरिनचे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू या सर्वोत्तम खेळाडूंचं आव्हान कसं पार करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.