भारतीय फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रीय संघात परदेशस्थित भारतीय वंशाच्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, असे मत भारताचा कर्णधार सुनील छेत्री याने व्यक्त केले. भारताच्या एका राज्याएवढेही अस्तित्व नसलेल्या ग्वामने २०१८च्या विश्वचषक पात्रता फेरीत भारताला नमवण्याची किमया केली होती. या पराभवामुळे भारताची विश्वचषकासाठी पात्र ठरण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. ही स्थिती सुधारावी या दृष्टीने छेत्रीने परदेशस्थित भारतीय वंशाच्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात खेळू देण्याची आग्रही मागणी केली आहे.
ग्वामविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या भारतीय वंशाच्या खेळाडूंना अर्थात पर्सन ऑफ इंडियन ओरिजन (पीआयओ) खेळाडू न खेळविण्याच्या कायद्यावर नाराजी व्यक्त केली होती. भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी परदेशात स्थायिक असलेले भारतीय वंशाचे खेळाडू राष्ट्रीय संघात खेळायला हवेत, असे ठाम मत त्यांनी मांडले होते. त्यांच्या याच मताला छेत्रीने सहमती दर्शवली आहे. ‘राईज विथ ट्विटर’ या चर्चासत्रासाठी छेत्री मंगळवारी मुंबईत आला होता. त्यावेळी त्याने ‘लोकसत्ता’शी बातचीत केली.
‘‘भारताची लोकसंख्या १०० कोटीहून अधिक आहे. भारतात अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत, परंतु त्यांचा शोध घेण्यासाठी वेळ लागेल. मात्र, सध्या भारताला पीआयओ खेळाडूंची आवश्यकता आहे. हे येणारे पीआयओ खेळाडू इतके प्रतिभावान असायला हवेत, की त्यांच्याकडून इतरांना काही शिकता आले पाहिजे. पीआयओच्या नावाखाली हवे तेवढे खेळाडू बोलवायचे आणि त्यांच्यावर वेळ वाया घालवायचा, हे पटण्यासारखे नाही. मात्र, पीआयओ हा दीर्घकालीन उपाय नाही़,’’ असे ठाम मत छेत्रीने मांडले.
भारतीय संघाची विश्वचषकासाठी पात्र होण्याची शक्यता किती आहे, यावर त्याने हे लक्ष्य अवघड असल्याचे सांगितले. ‘‘भारत सलग दोन सामने पराभूत झाला आहे आणि आमच्या गटात तगडे प्रतिस्पर्धी आहेत. आमचा संघ युवकांनी भरलेला आहे आणि आम्ही आत्ता केवळ विश्वचषकात पात्रता मिळवण्याचा विचार करून खेळलो, तर त्याने दडपण निर्माण होईल. पुढील सामन्यांवर लक्ष केंद्रित करून पुढे सरकणे हे आपल्या हातात आहे. ही केवळ विश्वचषक स्पध्रेची पात्रता फेरी नाही, तर यातून आशियाई फुटबॉल अजिंक्यपद स्पध्रेतही प्रवेश मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे उर्वरित सर्व सामन्यांत स्वत:ला झोकून खेळ करायला हवा. ’’
सिमल्याहून कमी लोकसंख्या असलेला ग्वाम संघ फुटबॉलमध्ये प्रगती करू शकतो, तर भारत का नाही, या प्रश्नावर छेत्री म्हणाला, ‘‘कोलकाता, बंगळुरू, गोवा या राज्यांपुरते फुटबॉल मर्यादित नाही, देशात फुटबॉलची ओढ प्रत्येक राज्यात आहे. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पायाभूत सुविधा मिळत नसल्याने अनेक प्रतिभावान खेळाडूंना आपण मुकतोय. इंडियन सुपर लीगच्या माध्यमातून ते व्यासपीठ उपलब्ध
झाले खरे, परंतु त्याला मर्यादा आहेत. ’’
भारतीय वंशाच्या फुटबॉलपटूंना राष्ट्रीय संघात स्थान हवे!
भारतीय फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रीय संघात परदेशस्थित भारतीय वंशाच्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, असे मत भारताचा कर्णधार सुनील छेत्री याने व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-07-2015 at 04:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nri football player should select for national team says sunil chhetri