केन विल्यमसन आणि ब्रॅडले वॉटलिंग यांच्या विश्वविक्रमी भागीदारीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शानदार एकत्रित कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १९३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवले.
न्यूझीलंडला पहिल्या डावात २२१ धावांचीच मजल मारता आली होती. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेने कुमार संगकाराच्या द्विशतकाच्या बळावर ३५६ धावा केल्या. दुसऱ्या डावातही न्यूझीलंडची ५ बाद १५९ अशी अवस्था झाली होती. मात्र त्यानंतर पाचव्या विकेटसाठी विल्यमसन-वॉटलिंग जोडीने केलेल्या विक्रमी नाबाद ३६५ धावांच्या भागीदारीने सामन्याचे चित्रच पालटले.
न्यूझीलंडने ५ बाद ५२४ धावसंख्येवर आपला डाव घोषित केला. विल्यमसनने २४२ तर वॉटलिंगने १४२ धावांची खेळी साकारली. विजयासाठी मिळालेल्या ३९० धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव १९६ धावातच संपुष्टात आला. लहिरू थिरिमानेने सर्वाधिक ६२ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे मार्क क्रेगने ४ बळी घेतले. द्विशतकी खेळी करणाऱ्या विल्यमसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Story img Loader