Mitchell Santner said I couldn’t believe my own catch: एकदिवसीय विश्वचषकाच्या १६व्या सामन्यात बुधवारी न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा १४६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने अफगाणिस्तानला २८९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ १३९ धावांत सर्वबाद झाला. या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयाचे अनेक हिरो होते. टॉम लॅथम (६८) आणि ग्लेन फिलिप्स (७१) यांनी फलंदाजीत आपली ताकद दाखवली, तर मिचेल सँटनर आणि लॉकी फर्ग्युसन यांनी गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. दोघांनी ३-३ विकेट घेतल्या.

सँटनरने घेतलेल्या झेलने वेधले सर्वांचे लक्ष –

मिचेल सँटनरने अप्रतिम गोलंदाजीसोबतच अप्रतिम क्षेत्ररक्षणही केले. अफगाणिस्तानच्या डावात, सँटनरने एक आश्चर्यकारक झेल घेतला. मिचेल सँटनरने अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीचा हा उत्कृष्ट झेल घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सामना संपल्यानंतर सँटनरने त्याच्या अविश्वसनीय झेलबद्दल आयसीसीशी चर्चा केली. तो म्हणाला की, “मला स्वतः माझ्या झेलवर विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा मी नंतर पाहिले, तेव्हा तो खरोखरच चांगला झेल होता. लॉकीने खूप चांगला बाउन्सर चेंडू टाकला होता.”

चेपॉक हे माझे दुसरे घर –

मिचेल सँटनरनेही या काळात आपल्या कामगिरीबद्दल सांगितले. तो म्हणाला की, आयपीएलदरम्यान मी चेन्नईमध्ये खूप खेळलो आहे आणि त्यामुळे मला येथील परिस्थितीची माहिती होती. सँटनर म्हणाले, “चेन्नई हे माझे दुसरे घर आहे. चेपॉकमध्ये खेळणे नेहमीच छान राहिले आहे.” मिचेल सँटनर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू असून २०१८ पासून या संघाकडून खेळत आहे. अशा स्थितीत त्याला चेपॉकमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नईच्या परिस्थितीचा सँटनरला फायदा झाला.

हेही वाचा – World Cup 2023: …तर यंदा टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार हे जवळपास निश्चित? हे पाच योगायोग देत आहेत संकेत

एकेकाळी न्यूझीलंडचा डाव होता अडचणीत –

न्यूझीलंडचा संघ एकेकाळी अफगाणिस्तानविरुद्धही अडचणीत सापडला होता. फलंदाजी करताना न्यूझीलंडने ११० धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे २५० धावांपर्यंत पोहोचणे देखील खूप कठीण वाटत होते, परंतु लॅथम आणि फिलिप्स यांच्यातील १४४ धावांच्या भागीदारीने न्यूझीलंडला २८८ धावांपर्यंत पोहोचवले. शेवटी, मार्क चॅपमनने १२ चेंडूत २५ धावांची स्फोटक खेळी खेळून मोठी धावसंख्या उभारण्यात हातभार लावला.

Story img Loader