Video of the catch by Glenn Phillips : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाला नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. किवी संघ फलंदाजीत काही विशेष कामगिरी करु शकला नाही आणि पहिल्या डावात केवळ १६२ धावाच करू शकला. २०० धावांच्या आत ऑलआऊट झाल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी जबरदस्त पलटवार केला. या दरम्यान ग्लेन फिलीप्सने लबूशेनचा अफलातून झेल पकडला, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडसाठी, मॅट हेन्रीने शानदार गोलंदाजी करताना ७ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का दिला. मात्र, मार्नस लबूशेनने एकट्याने आपल्या संघाचा मोर्चा सांभाळला होता. दरम्यान, न्यूझीलंडचे गोलंदाज सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे लबूशेनची विकेट मिळवण्याचा प्रयत्न करत होते, पण डावाच्या ६१व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर टीम साऊदीविरुद्ध त्याच्याकडून एक चूक झाली.
ग्लेन फिलीप्समध्ये संचारला ‘सुपरमॅन’ –
लबूशेनने टीम साऊदीविरुद्ध ऑफ साइडवर शानदार शॉट खेळला. यानंतर चेंडू हवेत होता आणि तो थेट चार धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर गेला असता हे स्पष्ट होते, परंतु पॉइंटवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या ग्लेन फिलीप्सच्या अंगात जणू सुपरमॅनच संचारला असल्याचे पाहिला मिळाले. कारण फिलीप्सने स्वतःला पूर्णपणे हवेत झोकून देत एका हाताने अफलातून झेल पकडला, ज्यामुळे लबूशेनचे खेळी संपुष्टात आली.
फिलीप्सने घेतलेला हा अफलातून झेल पाहून लबूशेनसह सर्वच अवाक झाले. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लबूशेन आपल्या डावात ९० धावा करून बाद झाला. या डावात त्याने १४७ चेंडूंचा सामना केला आणि १२ चौकार मारले, मात्र त्याचे शतक अवघ्या १० धावांनी हुकले.
हेही वाचा – IND vs ENG 5th Test : जेम्स अँडरसनने रचला इतिहास, ७०० विकेट्स घेणारा ठरला पहिला वेगवान गोलंदाज
ऑस्ट्रेलियाचा डाव २५६ धावांवर आटोपला –
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अगदी सामान्य होती. मार्नस लबूशेन वगळता इतर कोणत्याही फलंदाजाने खास कामगिरी केली नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव २५६ धावांवर आटोपला, मात्र तरीही संघाला ९४ धावांची भक्कम आघाडी मिळाली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या, तर साऊदी, बेन आणि फिलीप्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.