Nathan Lyon complete 1500 runs in Test Cricket : ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा १७२ धावांनी शानदार पराभव केला. या सामन्यात फिरकीपटू नॅथन लायनने ऑस्ट्रेलियन संघासाठी चमकदार कामगिरी केली. त्याने गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना फलंदाजीतही योगदान दिले. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत या विजयासह ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. फिरकीपटू नॅथन लायनने आपल्या धमाकेदार कामगिरीने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
हा पराक्रम करणारा नॅथन लायन पहिला खेळाडू –
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नॅथन लायन केवळ ५ धावांवर बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याने ४१ धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात एकूण ४६ धावा करत त्याने कसोटी क्रिकेटमधील १५०० धावा पूर्ण केल्या आहेत. नॅथन लायन आता एकही अर्धशतक न झळकावता १५०० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. कसोटी सामन्याच्या कोणत्याही डावात त्याने केलेली सर्वोच्च धावसंख्या ४७ आहे, जी त्याने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती. नॅथन लायनने आजपर्यंत १२८ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १६२ डावात फलंदाजी करताना १५०१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या नावावर ५२७ विकेट्स आहेत.
नॅथन लायनने केली उत्कृष्ट गोलंदाजी –
नॅथन लायनने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात चार तर दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात त्याने २७ षटकांत ६५ धावा देत ६ विकेट्ल घेतल्या. त्याच्यामुळेच न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात १९६ धावांत सर्वबाद झाला आणि सामना गमावला. न्यूझीलंडच्या भूमीवर कोणत्याही संघाविरुद्ध कसोटी सामन्यात १० विकेट्ल घेणारा नॅथन लायन हा १० वा फिरकी गोलंदाज ठरला आहे.
हेही वाचा – Yuzvendra Chahal : ‘झलक दिखला जा’च्या सेटवर संगीता आणि चहलमध्ये रंगला ‘WWE’ सामना, VIDEO होतोय व्हायरल
१८ वर्षांनंतर केला मोठा पराक्रम –
२००६ नंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. जेव्हा एका फिरकी गोलंदाजाने न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. २००६ मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाला होता. त्या सामन्यात डॅनियल व्हिटोरी आणि मुथय्या मुरलीधरन यांनी प्रत्येकी १० विकेट्स घेतल्या होत्या. आता १८ वर्षांनंतर नॅथन लायनने न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.
या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला –
कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत नॅथन लायन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने रंगना हेराथला मागे टाकले आहे. लायनने कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावात ११९ विकेट्स घेतल्या आहेत. तर हेराथने ११५ विकेट घेतल्या आहेत. कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत शेन वॉर्न पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने १३८ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – WTC : भारताने डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान, ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा झाला मोठा फायदा
कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
शेन वॉर्न – १३८ विकेट्स
नॅथन लायन – ११९ विकेट्स
रंगना हेराथ- ११५ विकेट्स
मुथय्या मुरलीधरन- १०६ विकेट्स
ग्लेन मॅकग्रा- १०३ विकेट्स