NZ vs PAK, World Cup 2023: विश्वचषकाच्या ३५व्या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रवींद्रने इतिहास रचला. त्याने शनिवारी (४ नोव्हेंबर) बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. रचिन रवींद्रने शानदार फलंदाजी करत या विश्वचषकात तिसरे शतक झळकावले. त्याने ९४ चेंडूत १०८ धावा केल्या. यादरम्यान त्याने १५ चौकार आणि एक षटकार लगावला. ३६व्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. मोहम्मद वसीम ज्युनियरचा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्याच्या प्रयत्नात सौद शकीलने त्याला झेलबाद केले. रचिन रवींद्र हा मूळचा बंगळुरूचा आहे. त्याचे वडील कामानिमित्त न्यूझीलंडला गेले होते. त्यानंतर ते तिथेच स्थिरावले आणि त्याला न्यूझीलंडचे नागरिकत्व मिळाले. त्यामुळे रचिन रवींद्र एकप्रकारे एम. चिन्नास्वामी स्टेडियम हे त्याचे घरचे मैदान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रचिनने या विश्वचषकात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही शतकी खेळी खेळली होती. विश्वचषकात तीन शतके झळकावणारा तो याआधीच पहिला खेळाडू ठरला आहे. याशिवाय विश्वचषकात तीन शतके करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू आहे. विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडच्या सहा खेळाडूंनी प्रत्येकी दोन शतके झळकावली आहेत. यापैकी तीन खेळाडू असे आहेत ज्यांनी एकाच विश्वचषकात प्रत्येकी दोन शतके झळकावली आहेत. रचिन सगळ्यांना मागे सोडून गेला.

न्यूझीलंडसाठी वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी दोन शतके झळकावणारे खेळाडू

ग्लेन टर्नरने १९७५ मध्ये, मार्टिन गुप्टिलने २०१५ मध्ये आणि केन विल्यमसनने २०१९ मध्ये प्रत्येकी दोन शतके झळकावली होती. या तिघांव्यतिरिक्त नॅथन अॅस्टल, स्कॉट स्टायरिस आणि स्टीफन फ्लेमिंग यांनीही प्रत्येकी दोन शतके झळकावली आहेत, परंतु तिघांनीही विश्वचषकाच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये अशी कामगिरी केली आहे.

रचिन रवींद्र वयाच्या २५ वर्षापूर्वी विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. वयाच्या २३ वर्षे ३५१ दिवसांत त्याने तिसरे शतक झळकावले. त्याच वेळी, सचिन तेंडुलकरने वयाच्या २२ वर्षे ३१३ दिवसांच्या वर्ल्ड कपमध्ये दोन शतके झळकावली होती.

२५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

फलंदाजदेशवर्षधावा
रचिन रवींद्रन्यूझीलंड२०२३५२३
सचिन तेंडुलकरभारत१९९६५२३
बाबर आजमपाकिस्तान२०१९४७४
एबी डिव्हिलियर्सदक्षिण आफ्रिका२००७३७२

रचिनच्या निशाण्यावर बेअरस्टोचा विक्रम

रचिन रवींद्रने या विश्वचषकात आतापर्यंत आठ डावांत फलंदाजी केली आहे. या काळात त्याने ५२३ धावा केल्या. पहिल्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो या बाबतीत आघाडीवर आहे. बेअरस्टोने २०१९ विश्वचषक स्पर्धेत ११ डावात ५३२ धावा केल्या होत्या. या विश्वचषकात रचिनने आणखी १० धावा केल्या तर तो बेअरस्टोला मागे टाकेल. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने २०१९ विश्वचषक स्पर्धेत आठ डावांत ४७४ धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने १० डावांत ४६५ धावा केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nz vs pak rachin ravindras record century the first batsman to do so in world cup history avw
Show comments