NZ W vs AUS W Australia Women beat New Zealand Women : ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत विजयी मोहीम कायम ठेवत सलग दुसरा विजय नोंदवला. न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने बेथ मुनीच्या (४०) आणि एलिस पेरीच्या (३०) धावांच्या जोरावर ८ गडी बाद १४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची तारांबळ उडाली, ज्यामुळे त्यांचा १९.२ षटकांत ८८ धावांवर गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ६० धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर केला आहे. कारण या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला असता, तर भारताचा मार्ग सुकर झाला असता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसी टी-२० विश्वचषकातील पहिला सामना जिंकून आलेल्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड संघांमध्ये चुरशीची अपेक्षा होती, मात्र सामना एकतर्फी झाल्याने पूर्णपणे निराशा झाली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चांगली सुरुवात केल्यानंतर सतत विकेट गमावल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. कर्णधार ॲलिसा हिली, बेथ मुनी आणि एलिस पेरी या आघाडीच्या तीन फलंदाजांशिवाय अन्य कोणीही जास्ता धावांचे योगदान देऊ शकले नाही. मुनीने सर्वाधिक ४० धावा केल्या तर एलिस पेरीने ३० धावांची खेळी केली. त्याचबरोबर कर्णधाराने २६ धावांचे केल्याने संघाला ८ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारता आली.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अचानक फिरवला सामना –

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला पहिला धक्का ७ धावांवर बसला. यानंतर सुझी बेट्सने अमेलिया केरसह डाव पुढे नेत ५४ धावांपर्यंत मजल मारली. सुझी बेट्स या धावसंख्येवर बाद झाली. यानंतर संघाने आणखी तीन विकेट्स गमावल्या. ज्यामुळे किवी संघाची धावसंख्या ६ बाद ६० धावा अशी झाली. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात अचानक पुनरागमन करत न्यूझीलंड संघला बॅकफूटवर ढकलले. न्यूझीलंड संघाने ५४ धावांवर २ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर ॲनाबेल सदरलँड आणि मेगन शट यांनी मिळून सलग विकेट्स घेत सामन्याची दिशाच बदलून टाकली. या सामन्यात या दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मेगन शटने ३ धावांत ३ विकेट्स, तर ॲनाबेलने २१ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – PAK vs ENG : पाकिस्तानच्या खेळाडूमध्ये संचारला ‘सुपरमॅन’, हवेत उडी मारत एका हाताने टिपला उत्कृष्ट झेल, पाहा VIDEO

न्यूझीलंडच्या पराभवाने बदलले समीकरण –

वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघ सलग दुसऱ्या विजयानंतर ग्रुप-ए मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचे ४ गुण आहेत. त्याचबरोबर पराभवानंतर न्यूझीलंडची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. किवी संघाचे आता २ सामन्यांत २ गुण झाले असून त्यांचा नेट रन रेट मायनसमध्ये आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे पाकिस्तानचा संघ २ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचेही २ गुण आहेत पण खराब नेट रन रेटमुळे ते टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहेत. शेवटच्या स्थानावर श्रीलंका संघ आहे ज्याचे खाते अद्याप उघडलेले नाही. न्यूझीलंडच्या पराभवामुळे भारतीय संघाला पुढील फेरीत जाणे कठीण झाले आहे. आता गटातील तीन संघांचे समान गुण आहेत, त्यामुळे भारतासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

हेही वाचा – NZ vs AUS : एलिस पेरीने केला मोठा पराक्रम! ‘ही’ खास कामगिरी करणारी ठरली ऑस्ट्रेलियाची पहिली खेळाडू

एका पराभवाने भारत उपांत्य फेरीतून बाहेर –

भारतीय संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळवायचे असेल, तर त्यांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. जेणेकरून त्यांचा नेट रन रेट सुधारू शकेल आणि त्यांना इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच एक जरी सामना गमावला तर उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात येईल. मात्र, न्यूझीलंडला भारतापेक्षा चांगली संधी आहे. कारण त्यांना पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे. त्याचवेळी भारताला ऑस्ट्रेलियाशी सामना करायचा आहे. मात्र, या सामन्यापूर्वी टीम इंडिया ९ ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nz w vs aus w australia women beat new zealand women by 60 runs in t20 world cup 2024 vbm