नाचता येईना अंगण वाकडे, ही म्हण भारतीय क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंना चपखल बसते. पराभवाचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडण्यात आपले खेळाडू अतिशय हुशार मानले जातात. रिओ येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताची अव्वल दर्जाची धावपटू ओ. पी. जैशा हिला महिलांच्या मॅरेथॉन शर्यतीत लाजिरवाण्या कामगिरीला सामोरे जावे लागले. आपल्या खराब कामगिरीचे खापर तिने तेथे आलेल्या अडचणींवर फोडले. मात्र तिने जी काही कारणमीमांसा दिली, ती सर्वसाधारण लोकांनाही पटणार नाही अशीच होती.

मॅरेथॉन शर्यतीच्या मार्गात पाण्याची व ऊर्जापेये ठेवण्यात आली नव्हती, भारतीय संघ व्यवस्थापनासाठी ठेवण्यात आलेल्या स्टॉल्सवर कोणीही नव्हते आदी कारणे तिने दिली आहेत. आपण मरणासन्नच झालो होतो, असे तिने मायदेशी परतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. जेव्हा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली जाते तेव्हा तारतम्य ठेवून मत व्यक्त करणे अपेक्षित असते. मात्र तेदेखील तारतम्य तिला दाखवता आले नाही. या शर्यतीत ती केवळ एकच भारतीय धावपटू सहभागी झाली नव्हती. तिच्याबरोबरच कविता राऊतदेखील सहभागी झाली होती. जैशाने जी कारणे दिली, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे कविता हिने सांगितले. जैशाला पाणी देण्यात आले होते तसेच तिला ऊर्जापेयेही देण्यात आली होती, मात्र ते घेण्यास तिने नकार दिला होता, असा स्पष्ट खुलासा करत या दोन्ही खेळाडूंचे प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव्ह यांनी जैशाचा खोटारडेपणा सिद्धच केला आहे.

ऑलिम्पिकमधील बहुतांश सर्व महत्त्वपूर्ण शर्यतींचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. साऱ्या जगात हे प्रक्षेपण झाले होते. महिलांची मॅरेथॉन शर्यत सुरू असताना पहिल्या आठ किलोमीटरनंतर अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था होती. थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या लोकांनाही तेथील सुविधांची माहिती कळत होती. इथिओपिया, केनिया आदी सहभागी देशांच्या खेळाडूदेखील तेथील पाण्याची मदत घेत होत्या. अगदी जरी हे पाणी अपरिचित असले तरी या खेळाडू डोक्यावर पाणी ओतून स्वत:ला ताजेतवाना करण्याचा प्रयत्न करीत होत्या. जैशालाच फक्त पाण्याच्या बाटल्या कशा दिसल्या नाहीत. तसेच निकोलाय यांनीही तिला ऊर्जापेये घेण्याची विनंती केली होती, मात्र ही विनंतीदेखील तिने फेटाळली. काही खेळाडूंना स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेण्याची सवय असते. जैशा याच खेळाडूंपैकी एक खेळाडू असावी.

पराभवदेखील खिलाडूवृत्तीने पचविण्याची आवश्यकता असते. आपल्याकडून घडलेल्या चुका स्वीकारण्यासाठी मन मोठे असावे लागते. ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता नेमबाज अभिनव बिंद्रानेदेखील यंदाच्या अपयशाचा स्वीकार खिलाडूवृत्तीने केला. प्राथमिक फेरीनंतरच्या विश्रांतीच्यावेळी त्याने खुर्चीवर आपली रायफल ठेवली होती. ही रायफल खाली पडली व खूप नुकसानही झाले. त्याचे पदक हुकल्यानंतर त्याने दिलखुलासपणे झालेल्या चुकीचा स्वीकार केला. आपण रायफल व्यवस्थितरीत्या ठेवू शकलो नाही याचाच अर्थ आपण कोठे तरी कमी पडत आहोत हे ओळखून त्याने स्पर्धात्मक नेमबाजीतून निवृत्त होण्याचा निर्णयही जाहीर केला. जैशाने अभिनवचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे होता. स्पर्धा संयोजक व आपल्या घरच्या राष्ट्रीय संघटनेवर टीका करीत ती मोकळी झाली. मात्र त्यामुळे विनाकारण तिने वादंग ओढवून घेतला आहे. कदाचित संघटनेकडून तिच्यावर कारवाईदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. झालेल्या चुकीबद्दल माफी मागून कारवाईचा कटू प्रसंग तिने टाळला पाहिजे अन्यथा तिची अ‍ॅथलेटिक्स कारकीर्दच धोक्यात येऊ शकते.

 

– मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com