Happy Birthday Ashish Nehra : आशीष नेहरा हा भारताचा माजी क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाजापैकी एक. त्याची उंची हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. १२ शस्त्रक्रिया करून प्रत्येक वेळी मैदानावर परत त्याच जिद्दीने उतरणार हा गोलंद ‘कमबॅक किंग’ म्हणून ओळखला जातो. मैदानावर शांत दिसणारा हा खेळाडू प्रत्यक्ष आयुष्यात इतका बोलका आहे की, समोरचा त्याचे बोलणे ऐकता ऐकता थकून जातो. खोडकर व हसमुख आशीष नेहरा आज गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेटमध्ये खेळाडू्ंच्या आयुष्यात अनेक चढ- उतार येत असतात; पण आशीषच्या आयुष्यात ते इतरांपेक्षा जरा जास्तच आले. २९ एप्रिल १९७९ रोजी दिल्लीच्या एका जाट कुटुंबात आशीषचा जन्म झाला. खरे तर आशीषला लहानपणापासूनच क्रिकेट आवडायचे. त्याचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी त्याला क्रिकेटचे लहान-मोठे पैलू शिकवले. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. आशीषने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर २४ फेब्रुवारी १९९९ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले; पण त्यात त्याला एकच विकेट घेता आली. त्यामुळे त्याला काही काळ संघापासून दूर ठेवले. अडीच वर्षांनंतर २००१ मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुन्हा पदार्पण केले आणि चांगली कामगिरी केली.

वीरेंद्र सेहवागबरोबरची खास मैत्री

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि आशीष नेहरा यांचे खास नाते आहे. दोघेही दिल्लीचे आणि दोघेही फिरोजशाह कोटला मैदानावर क्रिकेटची प्रॅक्टिस करायला जायचे. एका मुलाखतीत आशीष सांगतो, “वीरू नजफगढमध्ये राहायचा. तोसुद्धा फिरोजशहा कोटला मैदानावर प्रॅक्टिस करायचा. तो दररोज माझ्या घरी यायचा आणि मला प्रॅक्टिससाठी घेऊन जायचा. त्याच्याकडे बॅटिंगची मोठी किट बॅग असायची आणि माझ्याकडे बॉलिंगची छोटी किट बॅग असायची. सकाळी वीरू स्कूटर चालवायचा तेव्हा मी किट बॅगवर डोके ठेवून झोपायचो आणि परत येताना मी स्कूटर चालवायचो तेव्हा तो किट बॅगवर डोके ठेवून झोपायचा.

तो पुढे सांगतो, “वीरू जेव्हा घरी यायचा तेव्हा अनेकदा मी गाढ झोपेत असायचो. तेव्हा माझे वडील त्याला म्हणायचे, “तो झोपला आहे. त्याला प्लीज उठव.” माझी आई माझ्यासाठी दूध ठेवायची; पण ते दूध मी नाही, तर वीरू प्यायचा.”

हेही वाचा : T20 World Cup 2024 : ‘या’ खेळाडूला जर संधी मिळाली नाही तर त्याने भारताचे नुकसान, दिग्गज अंपायरचा निवडकर्त्यांना इशारा

अनोखी प्रेमकहाणी आणि लग्नाचा प्लान

आशीष नेहराची प्रेमकहाणी खूप कमी लोकांना माहीत आहे. २ एप्रिल २००९ मध्ये त्याने त्याची गर्लफ्रेंड रुश्माबरोबर लग्न केले. रुश्मा आणि आशीष २००२ मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये भेटले होते. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर सुरू झालेली ही प्रेमकहाणी प्रेमविवाहात परिवर्तित झाली.

आपल्या लग्नाचा किस्सा सांगताना आशीष एका मुलाखतीत म्हणतो, “मी माझ्या मित्रांबरोबर बसलो होतो. तिथे मी माझ्या लग्नाचा प्लान केला आणि सात दिवसांनंतर लग्न करण्याचं ठरवलं. मी त्या दिवशी रुश्माला सांगितलं की, सात दिवसांनंतर आपण लग्न करू या. तेव्हा तिला विश्वासच बसला नाही. कारण- मी त्या दिवशी मद्यपान केलं होतं. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी तिला सांगितलं. त्यानंतर पुन्हा एकदा २४ मार्चला सांगितलं, तेव्हा तिचा विश्वास बसला. २६ मार्चला ती आईला घेऊन माझ्या घरी आली. २८ व २९ मार्चला सर्व पाहुणे आले. त्यानंतर तिनं एका हॉटेलमध्ये ३० मार्चला कार्यक्रम आयोजित केला आणि २ एप्रिलला आम्ही लग्न केलं.”

आशीष सांगतो, त्याला १ एप्रिलला लग्न करायचं होतं; पण ‘एप्रिल फूल’ असल्यामुळे ती तारीख टाळली.
सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आशीष आणि रुश्मा यांनी लग्न केले. त्यांना दोन अपत्ये आहेत. रुश्माने वेळोवेळी आशीषला साथ दिली. त्याची शस्त्रक्रिया असो की, क्रिकेटमधील चढ- उतार; तिने घराची जबाबदारी कायम उचलली.

१२ शस्त्रक्रिया आणि क्रिकेटमधील चढ-उतार

आशीष नेहराने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत १२ शस्रक्रिया केल्या; पण त्याने कधीच हार मानली नाही. नेहरा सांगतो, “जर तुम्हाला वारंवार दुखापत होत असेल, तर तुम्हाला दुसऱ्यांच्या तुलनेत जास्त मेहनत करावी लागते.”
२००३ च्या विश्वचषक मध्ये नामिबियाविरुद्धच्या सामन्यात नेहराच्या पायाला दुखापत झाली होती. नेहरासाठी पुढचा सामना खेळणे कठीण होते; पण त्याने हार मानली नाही आणि तीन दिवसांनंतर नेहरा सुजलेल्या पायांत मोजे घालत मैदानावर उतरला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १० षटकांमध्ये फक्त २३ धावा देत त्याने सहा गडी बाद केले.

२००५ मध्ये कंबर आणि टाचेमध्ये झालेल्या दुखापतीमुळे त्याला क्रिकेटपासून दूर जावे लागले. त्याला संघात परत येण्यासाठी चार वर्षे लागली. २०११ च्या विश्वचषकामध्ये मुख्य वेगवान गोलंदाज म्हणून त्याला संघात घेण्यात आले; पण त्यातही उपांत्य फेरीमध्ये बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला क्रिकेट इतिहासातील अंतिम फेरीचा सुवर्णमयी सामना खेळता आला नाही. एका मुलाखतीत तो याविषयी खंत व्यक्त करताना दिसला.
नेहराच्या १२ शस्त्रक्रिया झाल्या; पण त्याने कधीच क्रिकेट सोडण्याचा विचार केला नाही. त्याची जिद्द आणि चिकाटी अनेकांना प्रेरित करणारी आहे.

हेही वाचा : VIDEO : एमएस धोनीच्या IPL मधील यशाचे आणि फिटनेसचे काय आहे गुपित? स्वत: माहीनेच केला खुलासा

२०१७ मध्ये उघडले व्हॉट्सअप अकाउंट

जेव्हा सर्वांकडे स्मार्टफोन होते तेव्हा, नेहरा मात्र बाबा आझमच्या काळातला नोकिया (Nokia E51) वापरत होता. त्याच्या पत्नीने त्याला नोकियानंतर थेट आयफोन घेऊन दिला. एका मुलाखतीत तो सांगतो की, त्याने २०१७ मध्ये व्हॉट्सअप उघडले. यावरून तुम्हाला कळेल की, नेहरा तंत्रज्ञानापासून किती दूर होता.

ट्विटरविषयी नेहरा एक किस्सा सांगतो, “एक व्यक्ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की महिन्यातून तीन ट्वीट करा. आम्ही तुम्हाला वर्षाचे ८० लाख रुपये देऊ. पण, ट्वीट काय करायचे हे आम्ही तुम्हाला सांगू. मी त्या व्यक्तीची ऑफर धुडकावून लावली.”

आशीष नेहरा नाश्त्यामध्ये काय खातो?

सडपातळ दिसणारा आशीष नेहरा १२ शस्त्रक्रियांनंतरसुद्धा फिट दिसायचा. त्याचे कधीच वजन वाढले नाही. एका मुलाखतीत त्याने सांगितल्यानुसार, त्याचा नाश्ता ठरलेला असायचा. सकाळी एक कप चहानं तो दिवसाची सुरुवात करतो. त्यानंतर तो नारळ पाणी आणि पपई खातो. त्यानंतर तो कधी मुसळीबरोबर केळी आणि दूध पितो. त्यानंतर आम्लेट, एक टोस्ट, एक ग्लास दूध (हळद किंवा बदाम) किंवा कधी तो दुधात मध, केळी व वेलची मिक्स करून पितो. कधी डोसा खातो. १५-२० दिवसांनंतर आलूचा पराठा खातो. पराठ्याबरोबर हळद, दही आणि एक कप चहा घेतो. पण, त्याचबरोबर नेहरा आवर्जून सांगतो की, पराठा खाताना दोन-तीन तासांची ट्रेनिंग सुरू असायला हवी.

इतर क्रिकेटपटू नेहराविषयी काय सांगतात?

विराट कोहली : लोकांना नेहरांविषयी खरंच माहीत नाही की, तो किती मजेशीर आहेत. तयांच्याबरोबर कधीही बसा. एक तर त्याचे बोलणे थांबत नाही. एकदा सुरू झाले, तर सकाळपासून रात्रीचा पूर्ण प्लान तो सांगतो.

रभजन सिंग : नेहरा मैदानावर एक सामना खेळायचा आणि मैदानावरून परतल्यानंतर एक वेगळा सामना खेळायचा. त्याची कॉमेंट्री नॉनस्टॉप सुरू असायची.

झहीर खान : नेहरा नेहरा आहेत. त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

युजराज सिंग : नेहरा कधीच एका जागेवर नीट उभा राहत नाही. बोलताना त्याच्या शरीराच्या हालचाली सुरू असतात. तो म्हणायचा, “माझ्या शरीरावर दुखापती नाहीत; तर दुखापतीत माझे शरीर फसले आहे.

नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी आशीष नेहराने १ नोव्हेंबर २०१७ रोजी न्युझीलंड विरुद्ध टी-२० सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा केली. आशीष नेहरा फिरोजशहा कोटला मैदानावर शेवटचा सामना खेळला. याच मैदानावर सुरुवातीच्या काळात त्याने क्रिकेटचे धडे घेतले होते आणि करिअरला सुरुवातही केली होती.
आशीष नेहरा १८ वर्षे क्रिकेट खेळला. या १८ वर्षांच्या कारकिर्दीत तो १७ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २७ टी-२० सामने खेळला. १६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने एकूण २३५ विकेट घेतल्या. हा आकडा आणखी वाढला असता; पण दुखापतीमुळे त्याला वारंवार क्रिकेटपासून दूर जावे लागले. पण, त्याने हार मानली नाही. प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर तो नवीन खेळी खेळायचा. निवृत्तीनंतरही तो थांबला नाही. आशीष नेहरा गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून सक्रिय आहे. २०२२ पासून आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सचा मु्ख्य प्रशिक्षक म्हणून सध्या तो कार्यरत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली गुजरातने २०२२ मध्ये विजेतेपदसुद्धा पटकावले होते.

साधा सरळ आणि शांत दिसणाऱ्या आशीष नेहरामध्ये जिद्द आणि चिकाटी कायम आहे. प्रत्येक वेळी त्याने ते सिद्ध करून दाखवले. तो कधी मोठ्या जाहिरातीत झळकला नाही आणि कधी मोठ्या क्रिकेटपटूंच्या रांगेतही बसला नाही. कधी त्याचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये आले नाही, तसेच तो कधी मीडियामध्ये वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला नाही. आशीष नेहरा फक्त खेळला, अनेकदा तो शस्त्रक्रियेमुळे धडपडला; पण प्रत्येकवेळी पुन्हा जिद्दीने उठून तो पुन्हा खेळला!

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odd man out cricketer ashish nehra fast bowler used to use nokia phone in smartphone world read more interesting stories about comeback king ltdc ndj
Show comments