ICC Cricket World Cup 2023: आयसीसीने यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. विश्वचषकाच्या वेळापत्रकावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबीचे भारतात येणे अद्याप निश्चित नाही. दुसरीकडे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही या वेळापत्रकावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल यानेही स्थळ बदलण्याच्या आपल्या बोर्डाच्या मागणीवर निशाणा साधला आहे आणि आयसीसीने ही मागणी मान्य न करून चांगले केले असल्याचे म्हटले आहे.
ठिकाण बदलण्याच्या मागणीसाठी अकमलने पीसीबीवर साधला निशाणा
अकमलने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, “भारत आणि पाकिस्तान संघ १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये एकमेकांशी भिडतील. आशियातील परिस्थिती सर्वात जास्त भारत आणि पाकिस्तान या दोन संघांनाच माहिती असून त्याचा त्यांनी योग्य वापर करायला हवा. नाहीतर, विश्वचषकादरम्यान जी परिस्थिती निर्माण होईल त्याचा सर्वाधिक फटका या दोघांनाच बसणार आहे आणि हे सर्वांनाच ठाऊक आहे.”
पुढे तो म्हणाला की, “मी मीडियामध्ये वाचल्याप्रमाणे, पीसीबी आयसीसीकडे अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी करत होता. यासोबतच भारताविरुद्धच्या सामन्याबाबत स्थळ बदलण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आयसीसीने ही विनंती फेटाळून लावली, ही चांगली गोष्ट आहे. पीसीबीने मागणी करायला नको होती.”
‘आयसीसीला स्थळ बदलण्यास सांगणे मूर्खपणाचे’- अकमल
अकमल पुढे म्हणाला, “ही आयसीसीची स्पर्धा असून ते जिथे ठरवतील तिथे आम्ही सामने खेळले पाहिजेत. जर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा सल्ला आता मान्य केला असता, तर उद्याउठून दुसऱ्या कोणत्याही संघाने आयसीसीच्या इतर कोणत्याही स्पर्धेत आपले ठिकाण बदलण्याची मागणी केली असती. अशा स्थितीत ज्या आयसीसीच्या स्पर्धा खेळवल्या जातात त्याला काही अर्थ राहणार नाही. जिथे जिथे सामने होतील तिथे खेळायला हवे त्यातच खरी मजा आहे. पीसीबीने अशी मागणी करायला नको होती ही मागणी करणं म्हणजे मी ते मूर्खपणाचे लक्षण मानेन.” याबरोबरच त्याने वेळापत्रकाबद्दल काहीशी नाराजीही व्यक्त केली. तो म्हणाला की, “पाकिस्तानचे सुरुवातीचे दोन सामने क्वालिफायर संघांविरुद्ध आहेत. यातील एक सामना मजबूत संघाविरुद्ध ठेवायला हवा होता.”
अकमलने वेळापत्रकात काही बदल सुचवले
अकमल पुढे म्हणाला, “ स्वतःच्या ताकदीवर पाकिस्तानला विश्वास ठेवायला हवा. पाकिस्तानचे क्वालिफायर संघांविरुद्ध जे दोन सामने ठेवले आहेत त्यापैकी एक सामना न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी ठेवायला हवा होता. असे दबावाचे सामने खेळण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असता आणि त्यांनी चांगली तयारीही केली असती. ज्याप्रमाणे भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठेवण्यात आला आहे, त्याचप्रमाणे पाकिस्तानला एक-दोन सामने द्यायला हवे होते जेणेकरून तयारी झाली असती.”
१५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अकमल म्हणाला, “जेव्हा जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये सुमारे एक लाख ३० हजार प्रेक्षकांसमोर दोन्ही संघांमध्ये सामना होईल तेव्हा तणावपूर्ण वातावरण असेल. दोन्ही संघ पूर्ण तयारीनिशी उतरतील. या सामन्याचा गाजावाजा संपूर्ण जगात होईल. या सामन्यावर ही संपूर्ण स्पर्धा अवलंबून असेल.”