ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली असताना आव्हान टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन संघांदरम्यान आज, सोमवारी पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर लढत होणार आहे. आणखी एका धक्कादायक निकालासाठी अफगाणिस्तान संघ प्रयत्नशील असेल, तर त्याच वेळी श्रीलंका संघ आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. एकूणच सातत्याच्या आघाडीवर या दोन्ही संघांची कसोटी लागणार आहे.

स्पर्धेपूर्वी अफगाणिस्तानच्या संघाकडून फारशा अपेक्षा केल्या जात नव्हत्या. मात्र, त्यांनी इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन माजी विजेत्यांवर मात करून स्पर्धेत सनसनाटी निर्माण केली आहे. आता आणखी एका माजी विजेत्याविरुद्ध असेच धक्कातंत्र अजमावण्यासाठी अफगाणिस्तान सज्ज झाला आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाला खेळाडूंच्या दुखापतींना सामोरे जावे लागल्याने त्यांनी काही काळ संघाबाहेर असलेल्या, पण गाठीशी बराच अनुभव असलेल्या खेळाडूंकडे वळण्याचा निर्णय घेतला. अँजेलो मॅथ्यूज आणि दुश्मंत चमीरा या दोघांमुळे श्रीलंका संघाने आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

या सामन्याचा विचार करायचा झाल्यास दोन्ही संघ दोन विजय मिळवून आपले आव्हान कायम राखून आहेत. या सामन्यातील विजयी संघ स्पर्धेत पुढे जाऊन चौथ्या क्रमांकाचे गणित किचकट करू शकेल. अर्थात, अशा वेळी या संघांना अन्य संघांच्या कामगिरीकडेही लक्ष ठेवून राहावे लागणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानाची खेळपट्टी ही फलंदाजीस पोषक असल्यामुळे फलंदाजांची नजर बसल्यास येथे आणखी एक तीनशेहून अधिक धावांचा सामना बघायला मिळू शकतो.पुण्यातील सध्याच्या थंडीचे वातावरण बघता संध्याकाळपासून हवेत येणारा गारवा आणि बरोबरीने पडणारे दव याचा सामन्यावर परिणाम होऊ शकेल. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यापेक्षा नाणेफेक जिंकणारा संघ येथे आव्हानाचा पाठलाग करणे पसंत करेल यात शंका नाही. पाकिस्तानविरुद् आव्हानाचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे अफगाणिस्तानचा विश्वास चांगलाच उंचावलेला असेल. श्रीलंकेने सलग दोन सामने जिंकल्याने त्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा >>>IND vs ENG: बाबर आझमने रोहित शर्माबाबत केले मोठे विधान; म्हणाला, “कठीण परिस्थितीत

अफगाणिस्तान

’अफगाणिस्तानसाठी सलामीचा फलंदाज रहमनुल्ला गुरबाजने २२४ धावा केल्या आहेत. इब्राहिम झादरान, कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि रहमत शाह यांचे योगदानही विसरता येणार नाही.

’अफगाणिस्तानची खरी ताकद ही त्यांच्या फिरकी गोलंदाजीत असेल. रशीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान यांच्याबरोबरीने १८ वर्षीय नूर अहमद अशी गुणवान फिरकी चौकडी अफगाणिस्तानकडे आहे.

’नवीन उल हक आणि फझलहक  फरुकी या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला बळी मिळवल्यास बाकी जबाबदारी ही फिरकी चौकडी उचलू शकते.

अफगानिस्तान : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह झादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक

हेही वाचा >>>IND vs ENG Match Point: विराट कोहली शून्यावर बाद! ड्रेसिंग रूममध्ये रागात केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video व्हायरल

श्रीलंका

’श्रीलंकेच्या आतापर्यंतच्या प्रवासात पथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, कर्णधार कुसाल मेंडिस, कुसाल परेरा ही नाव झटकन डोळय़ासमोर येऊन जातात. पण, यांच्या कामगिरीत सातत्य दिसून आलेले नाही.

’गोलंदाजीत दिलशान मदुशंका, कसून रजिता यांनी छाप पाडली असली, तरी स्पर्धेत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येत असताना महेश थीकसानाला येत असलेले अपयश श्रीलंकेला निश्चित सलत असेल.

’वानिंदू हसरंगाची उणीव श्रीलंकेला नक्कीच जाणवत आहे. कदाचित यामुळेच चमीरा आणि मॅथ्यूज यांच्या अनुभवाकडे श्रीलंकेला वळावे लागले आहे.

श्रीलंका:

कुसाल मेंडिस(कर्णधार), कुसाल परेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रम, चरिथ असलंका, धनंजय डिसिल्वा, महीश थीकसाना, दुनिथ वेल्लालागे, कसून राजिता, अँजेलो मॅथ्यूज, दुश्मंत चमीरा, दिलशान मदुशंका, दुशान हेमंता

वेळ : दुपारी २ वा.  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार अ‍ॅप

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odi world cup 2023 afghanistan sri lanka match at gahunje ground sport news amy
Show comments