अन्वय सावंत
IND vs AUS match updates अहमदाबाद : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मायदेशातील एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवताना साखळी फेरीतील नऊ आणि उपांत्य फेरी असे एकूण १० सामने जिंकले आहेत. त्यामुळे रोहितच्या संघाने १४२ कोटी क्रिकेटवेड्या भारतीयांना विश्वविजेतेपदाचे स्वप्न दाखवले आहे. आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाला आज, रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतवावे लागणार आहे. भारताच्या वर्चस्वाची ही अंतिम, पण सर्वांत मोठी कसोटी असणार आहे.
भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने २०१३ ची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाने ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धामध्ये वारंवार निराशा केली आहे. २०१५ आणि २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकांत भारताला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. तसेच ट्वेन्टी-२० विश्वचषकांतही भारतीय संघ अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. २०१४च्या स्पर्धेत अंतिम फेरीत, तर २०१६ आणि २०२२च्या स्पर्धामध्ये उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मोठ्या सामन्यांमध्ये यशस्वी ठरण्यासाठी आवश्यक मानसिकता भारतीय संघाकडे नाही अशी वारंवार टीका झाली. मात्र, या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्याची संधी भारतीय संघाला आज अहमदाबादेत मिळणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित सव्वा लाख चाहत्यांचा भारतीय संघाला पािठबा लाभेल हे निश्चित.
हेही वाचा >>>कोल्हापुरात क्रिकेटचा ज्वर शिगेला; क्रिकेटपटूचे फलक, बेटिंग, निळ्या गणवेशाचे वातावरण
भारतीय संघाने २०११ मध्ये मायदेशात झालेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला संघ ठरला होता. त्यानंतर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०१९ मध्ये इंग्लंड या संघांनाही आपल्या मायभूमीत विश्वविजेतेपद मिळवण्यात यश आले. आता रोहितचा भारतीय संघ ही प्रथा कायम राखेल अशी चाहत्यांना नक्कीच आशा आहे.
भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषकात सर्वच प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले आहे, अपवाद केवळ सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलिया आणि उपांत्य लढतीत न्यूझीलंडचा. चेन्नई येथे झालेल्या आपल्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ १९९ धावांत गारद झाला. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी भारताची तीन बाद दोन धावा अशी स्थिती केली होती. परंतु विराट कोहली आणि केएल राहुल यांनी झुंजार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात दोन्ही संघांनी आपल्यातील लढवय्या वृत्तीचे दर्शन घडवले होते.
खेळपट्टीचे स्वरूप कसे?
या सामन्याची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता आहे. मात्र, रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार खेळपट्टीवर थोडे गवतही असल्याने वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळेल. तसेच फलंदाजांनी खेळपट्टीवर वेळ घालवल्यास त्यांनाही धावा करता येऊ शकतील असा अंदाज आहे. भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडने सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन ते तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली.
इतिहास रचण्याची संधी
ऑस्ट्रेलियन संघाने ९० आणि २०००च्या दशकात जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. त्यांनी २००३ आणि २००७मध्ये अपराजित राहत एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद मिळवले. आता अशीच ऐतिहासिक कामगिरी करण्याची भारतीय संघाला संधी आहे. २००३च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले होते. आता दोन दशकांनंतर या पराभवाचा वचपा काढण्याची भारतीय संघाला संधी मिळणार आहे.
प्रतिष्ठितांची उपस्थितीमुळे कडक सुरक्षाव्यवस्था!
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्लेस अशा राजकारणातील दिग्गजांपासून आजपर्यंत विश्वचषक जिंकलेल्या संघांचे सर्व कर्णधार ते सिनेसृष्टीतील कलाकार, श्रीमंत व्यक्ती असे अनेक जण या सामन्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्टेडियम परिसरातील तब्बल सहा हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. स्टेडियममध्ये जागोजागी पोलिस दिसून येत आहेत.
अंतिम सामन्यासाठी माजी विश्वचषक विजेते कर्णधार क्लाइव्ह लॉइड, कपिल देव, अॅलन बॉर्डर, अर्जुना रणतुंगा, स्टीव्ह वॉ, रिकी पॉिन्टग, मायकल क्लार्क, महेंद्रसिंह धोनी, इयॉन मॉर्गन यांना ‘आयसीसी’कडून निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या सर्वामध्ये पाकिस्तानचा विश्वविजेता कर्णधार इमरान खानची गैरहजेरी जाणवणार आहे. पाकिस्तानातील राजकीय उलथापालथीत इमरान खान सध्या अटकेत आहे. सामन्याच्या पहिल्या डावानंतरच्या मधल्या वेळेत या सर्व माजी कर्णधारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, शार्दूल ठाकूर, प्रसिध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, अॅडम झँम्पा, कॅमरून ग्रीन, मार्कस स्टोइनिस, अॅलेक्स कॅरी, शॉन अॅबट.
’वेळ : दुपारी २ वा. ’थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी, हॉटस्टार अॅप