पीटीआय, बंगळूरु

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे जागतिक क्रिकेटमधील बलाढय़ संघ शुक्रवारी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट सामन्यात समोरासमोर येणार आहेत. बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघांचा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या विभागांतील आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न असेल. या सामन्यात मोठी धावसंख्या अपेक्षित आहे.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोनही संघांची सुरुवात अडखळती राहिली आहे. या विश्वचषकात खेळलेल्या आतापर्यंतच्या तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियाला केवळ एक, तर पाकिस्तानला दोन सामने जिंकता आले आहेत. पाकिस्तानला गेल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंना अपेक्षांचे दडपण हाताळता आले नाही आणि या एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवला.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या संघालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, विश्वचषक स्पर्धामध्ये ऑस्ट्रेलियन संघाला नमवणे कधीही सोपे नसते. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानविरुद्ध सहा सामने जिंकले असून, चार सामने गमावले आहेत.

भारत व दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने गेल्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला. परंतु पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यास उपांत्य फेरी गाठण्याची त्यांची वाट अधिक बिकट होऊ शकते. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >>>IND vs BAN: पुण्यनगरीत कोहलीचे ‘विराट’पर्व! ४८ व्या शतकासाठी पंचांची मदत? मेहदी हसन मिराजचा रडीचा डाव

ऑस्ट्रेलिया

’ मिचेल मार्श व डेव्हिड वॉर्नर यांना स्पर्धेच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. मार्शने गेल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ५२ धावांची खेळी केली, पण तो झगडताना दिसला. त्यामुळे मार्श आणि वॉर्नर या दोघांचाही कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न असेल.

’ स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन या मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरीही महत्त्वाची असेल. ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस या अष्टपैलू खेळाडूंनी योगदान देणे संघासाठी महत्त्वाचे आहे.

’ स्टार्क, पॅट कमिन्स व जोश हेझलवूड या तीन अनुभवी गोलंदाजांना आपल्या पूर्ण क्षमतेने खेळावे लागेल. लेग-स्पिनर अ‍ॅडम झ्ॉम्पाला गेल्या सामन्यात लय सापडली ही ऑस्ट्रेलियासाठी समाधानकारक बाब आहे. त्याने चार बळी मिळवले होते.

पाकिस्तान

’ इमाम-उल-हक व अब्दुल्ला शफिक या सलामीवीरांवर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. इमामने तीन सामन्यांत केवळ ६३ धावा केल्या आहेत. 

’ पाकिस्तानच्या फलंदाजीची मदार ही प्रामुख्याने कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर आहे. दोघांनी भारताविरुद्ध चांगली फलंदाजी केली, पण ते बाद होताच पाकिस्तानचा डाव गडगडला. 

’ अष्टपैलू शादाब खान व इफ्तिखार अहमद यांना संघासाठी योगदान द्यावे लागेल. शादाबने लेग-स्पिन गोलंदाजी आणि फलंदाजीत निराशा केली आहे.

’ शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ व हसन अली यांनी वेळीच लयीत येणे आवश्यक आहे. बंगळूरुच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरू शकेल.

’ वेळ : दु. २. वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदूी (संबंधित एचडी वाहिन्या), हॉटस्टार अ‍ॅप

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odi world cup cricket 2023 australia vs pakistan match sport news amy
Show comments