पीटीआय, हैदराबाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

World Cup 2023 सात वर्षांच्या कालावधीनंतर भारतात खेळत असलेला पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामीसाठी उत्सुक असेल. पाकिस्तानचा संघ आज, शुक्रवारी हैदराबाद येथे तुलनेने दुबळय़ा नेदरलँड्सविरुद्ध आपला सलामीचा सामना खेळणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचे पारडे जड मानले जात असून कर्णधार बाबर आझमच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल.

पाकिस्तान संघाला विश्वचषकापूर्वी अपयशाला सामोरे जावे लागले आहे. आशिया चषकाची अंतिम फेरी गाठण्यात अपयश आल्यानंतर पाकिस्तानला भारतात दाखल झाल्यानंतर दोनही सराव सामन्यांत पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानला काही प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीबाबतही चिंता आहे. अशात नेदरलँड्सविरुद्ध सलामीचा सामना खेळायला मिळणे हे पाकिस्तानसाठी फायद्याचे ठरू शकेल.

हेही वाचा >>>World Cup 2023: रचिन रवींद्रने शतकाच्या जोरावर न्यूझीलंडसाठी रचला इतिहास, अष्टपैलू खेळाडूचे भारताशी आहे खास नाते

सध्याच्या पाकिस्तान संघातील केवळ दोन खेळाडूंना भारतात खेळण्याचा अनुभव आहे. भारत आणि पाकिस्तान येथील वातावरण सारखेच असले, तरी येथील मैदाने आणि खेळपट्टय़ांशी जुळवून घेण्यास पाकिस्तानच्या खेळाडूंना थोडा वेळ लागू शकेल. ‘‘भारतातील बहुतांश मैदानावरील सीमारेषा जवळ आहेत. त्यामुळे गोलंदाजांची कसोटी लागते. गोलंदाजाकडून थोडीही चूक झाली, तर फलंदाजाला त्याचा फायदा होता. त्यामुळे या स्पर्धेत मोठय़ा धावसंख्या अपेक्षित आहेत,’’ असे बाबर म्हणाला.

दुसरीकडे, पात्रता स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या आधारे विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या नेदरलँड्स संघाचा धक्कादायक निकाल नोंदवण्याचा प्रयत्न असेल. नेदरलँड्सचा संघ २०११ नंतर प्रथमच एकदिवसीय विश्वचषकात खेळणार आहे. त्यांच्या दोनही सराव सामन्यांना पावसाचा फटका बसला. त्यामुळे त्यांना पुरेशा सरावाविनाच पाकिस्तानविरुद्ध मैदानावर उतरावे लागणार आहे.

हेही वाचा >>>World Cup, ENG vs NZ: रवींद्र- कॉनवेची वादळी शतके! न्यूझीलंडपुढे माजी विश्वाविजेत्यांनी टेकले गुडघे, इंग्लंडचा नऊ विकेट्सने केला दारूण पराभव

पाकिस्तान

  • पाकिस्तानच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार बाबर आझमवर असेल. बाबर सध्या ‘आयसीसी’च्या जागतिक क्रमवारीतील अव्वल फलंदाज आहे. तो भारतात प्रथमच स्पर्धात्मक सामना खेळणार आहे.
  • बाबरला इमाम-उल-हक आणि मोहम्मद रिझवान यांची साथ मिळणे गरजेचे आहे. रिझवानने न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकावले होते.
  •  सलामीवीर फखर झमानमध्ये पाकिस्तानला आक्रमक सुरुवात करून देण्याची क्षमता आहे. मात्र, गेल्या काही काळात त्याला धावांसाठी झगडावे लागले आहे. त्यामुळे त्याच्या जागी अब्दुल्ला शफीकला संधी देण्याचा पाकिस्तानचे संघ व्यवस्थापन विचार करू शकेल.
  • वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार असल्याने हसन अलीचा पाकिस्तानच्या संघात समावेश करण्यात आला. हसनने कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.
  • शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांच्यावर पाकिस्तानच्या गोलंदाजीची मदार आहे. शाहीनविरुद्ध नेदरलँड्सच्या आघाडीच्या फलंदाजांचा कस लागेल. लेग-स्पिनर शादाब खानच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे.

नेदरलँड्स

हेही वाचा >>>गोष्ट वर्ल्डकपची तुमच्या भेटीला

  • नेदरलँड्सच्या संघाला यश मिळवायचे झाल्यास अष्टपैलू बास डी लीडेला आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. त्याने पात्रता स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्ध ९२ चेंडूंत १२३ धावांची उत्कृष्ट खेळी करत नेदरलँड्सचा विश्वचषकात प्रवेश मिळवून दिला होता.
  • आंध्र प्रदेशात जन्मलेल्या, पण आता नेदरलँड्सकडून खेळणाऱ्या तेजा निदामनुरूवर मधल्या फळीची भिस्त असेल. कर्णधार स्कॉट एडवर्डसची भूमिकाही महत्त्वाची आहे.
  • दक्षिण आफ्रिकेचा माजी डावखुरा फिरकीपटू रुलॉफ व्हॅन डर मर्व बऱ्याच काळापासून नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करत आहे. ३८ वर्षीय व्हॅन डर मर्वचा अनुभव नेदरलँड्ससाठी फायदेशीर ठरू शकेल.

वेळ : दु. २ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी, हॉटस्टार (मोफत) ठिकाण : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odi world cup cricket tournament pakistan vs netherlands match odi world cup 2023 sport news amy
Show comments