टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकल्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीला ५-४ने हरवून भारताने ४१ वर्षानंतर इतिहास रचला. भारतीय हॉकीच्या सुवर्ण युगाचा पुन्हा प्रारंभ झाला असल्याचे मत अनेकांनी दिले. भारताचा कर्णधार मनप्रीत सिंगने नवीन पटनायक यांचे आभार मानत एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओवर पटनायक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवीन पटनायक यांनी एक ट्वीट करत मनप्रीतला सलाम ठोकला आहे. ”अभिमानी कर्णधार आणि संघाला एक कोटी सलाम. तुमचं दुसरं घर ओडिशा १७ ऑगस्टला स्वागत करण्यासाठी सज्ज झालंय”, असे पटनायक यांनी ट्वीटमध्ये म्हटले. खरे तर, ओडिशा सरकारने २०१८मध्ये हॉकी इंडियासोबत ५ वर्षांचा करार केला. कनिष्ठ, वरिष्ठ, पुरुष आणि महिला सर्व राष्ट्रीय संघांसाठी १५० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. हा करार २०२३ पर्यंत आहे. याशिवाय, ओडिशा सरकार जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, पुनर्वसन सुविधा, सराव खेळपट्ट्या आणि स्पर्धांच्या माध्यमातून हॉकीला नवीन जीवन देत आहे.
A billion salute to the proud captain, @manpreetpawar07 and entire team of Indian Men’s Hockey. Your second home, #Odisha is looking forward to welcome you on 17th August. #Tokyo2020. #OdishaCelebratesOlympicGloryhttps://t.co/k6HnFuzIwE
— Naveen Patnaik (@Naveen_Odisha) August 5, 2021
भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव करत ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. सुरुवातीला आघाडी घेतलेल्या जर्मनीला भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत पराभवाची धूळ चारली. दरम्यान यलो कार्डमुळे मैदानात एक खेळाडू कमी असल्याने जर्मनीने मोठा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची खेळी पाहून जर्मनी गोलकीपरशिवाय खेळली.
हेही वाचा – ‘किती अन्यायकारक आहे हे…,’ कुस्तीपटू रवीकुमारचा फोटो शेअर करत सेहवागने व्यक्त केला संताप
असा रंगला भारत-जर्मनी सामना
भारताकडे ५-४ अशी आघाडी असताना काही करून बरोबरी करण्याच्या उद्देशाने जर्मनीने आपले आक्रमण वाढवण्याचा निर्णय घेतला. भारताची बचावफळी भेदता येत नसल्याचे व अनेक पेनल्टी कॉर्नरवर गोल करता येत नसल्याचे बघून जर्मनीने गोलकीपरशिवाय खेळून एक आक्रमक खेळाडू खेळवण्याचा निर्णय सामना संपायला काही मिनिटे असताना घेतला. त्यांचा हा निर्णय अचूक ठरण्याची शक्यताही निर्माण झाली. परंतु शेवटच्या सहा सेकंदांमध्ये भारताच्या गोलकीपरने व बचावफळीने अप्रतिम बचावाचे दर्शन घडवले व जर्मनीचे मनसुबे धुळीला मिळवले आणि कांस्यपदकावर नाव कोरले.
१९४८ ते १९६० ऑलिम्पिक स्पर्धा
स्वातंत्र्योत्तर काळात ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारताचा दबदबा दिसून आला. जागतिक महायुद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा १९४८ मध्ये लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने हॉकीत सुवर्ण पदक पटकावलं होते. स्वातंत्र्यानंतर भारताचे हे पहिले सुवर्ण पदक होते. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा वैयक्तिक पदक पटकावले. कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांनी कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दुसरे सुवर्ण पदक पटकावले होते. त्यानंतर १९५६ मध्येही भारताने सुवर्ण पदक पटकावले. मात्र १९६० मध्ये भारतीय हॉकी संघाला पराभव सहन करावा लागला आणि रजत पदकावर समाधान मानावे लागले. भारताने १९६४ टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा हॉकीत सुवर्ण पदक पटकावत पुनरागमन केले. १९६८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी टीमला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर १९७२ ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताला कांस्य पदक मिळाले. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक पटकावले. भारताचे हे हॉकीमधले शेवटचे पदक होते.