फुटबॉल, मोटोक्रॉस अशा अनेक चित्तथरारक खेळांचा अनुभव गुजरात फॉच्र्युन जायंट्स संघाची मुख्य फिजिओ ऑलिव्हिया विटेक यांनी घेतला आहे. परंतु या खेळांपेक्षाही प्रो कबड्डी लीगने भारावून टाकल्याचे विटेक आवर्जून सांगतात.
गुजरातने प्रथमच या स्पर्धेत पदार्पण केले असून तीन महिन्यांच्या या स्पर्धेसाठी संघातील खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीची जबाबदारी विटेक या महिलेकडे दिली आहे. पोलंडच्या या वैद्यकीय तज्ज्ञाकडे यापूर्वी अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेतील पोलंडच्या संघाची जबाबदारी होती. त्यांचे काम पाहूनच गुजरातच्या संघ व्यवस्थापनाने त्यांची निवड केली.
विटेक यांचे वडील वैद्यकीय तज्ज्ञ असल्यामुळे मोठेपणी हाच वसा चालण्याचेच त्यांचे ध्येय होते. मात्र खेळातही आवड असल्यामुळे दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करायचे असेल तर क्रीडा वैद्यकतज्ज्ञ व्हायला पाहिजे अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. खेळाडूंवरील उपचारांबाबत अधिकाधिक आधुनिक तंत्राची माहिती आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी चीन व अमेरिका या दोन्ही देशांमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यांनी अमेरिकन फुटबॉल, व्हॉलीबॉल, मोटोक्रॉस आदी खेळांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंसाठी फिजिओ म्हणून काम केले आहे.
अन्य खेळांपेक्षा कबड्डीचा अनुभव कसा वाटला असे विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘कबड्डीमध्ये सतत वेगवान हालचाली होत असतात. तेथे सहभागी झालेल्या खेळाडूंना खूपच वेगवेगळ्या दुखापतींना सामोरे जावे लागत असते. ते माझ्यासाठी सत्त्वपरीक्षा घेणारेच आव्हान आहे आणि मला नेहमी आव्हानांना तोंड द्यायला आवडते. तसेच या खेळातील खेळाडूंची तंदुरुस्ती समसमान नाही. तेदेखील एक आव्हानच असते. मी अनेक देशांचा प्रवास केला आहे. प्रत्येक ठिकाणी मी माझी कारकीर्द घडवण्यासाठी जे काही शिकायला मिळाले, ते आत्मसात करण्यावर भर दिला. खेळाडूंच्या तंदुरुस्तीप्रमाणेच त्यांना योग्य आराम मिळणेही महत्त्वाचे असते. चीनमध्ये त्यास अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच मी येथेही कबड्डीपटूंना योग्य आराम कसा मिळेल, याकडे विशेष लक्ष दिले आहे.’’
भारतीय पदार्थाबाबत तसेच पोशाखाबाबत काय सांगता येईल, असे विचारले असता विटेक म्हणाल्या, ‘‘भारतातील पदार्थ खूप मसालेदार असतात. अर्थात मी येथे अनेक दिवस असल्यामुळे मलाही या पदार्थाबद्दल विशेष रुची निर्माण झाली आहे. या ठिकाणचा डाळ-भात हा पदार्थ मला सर्वात जास्त आवडला आहे. बराच वेळ मी अहमदाबादला होते, तेव्हा येथील महिलांच्या साडय़ा पाहून मला खूप आश्चर्य वाटत असे. एक-दोन वेळा मी साडी नेसण्याचाही प्रयत्न केला. तो यशस्वीही झाला व छायाचित्रेही काढून घेतली. मात्र ते खूप अवघड काम आहे. त्यापेक्षा खेळाडूंच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देणे सोपे आहे. मला भारतात फिजिओ म्हणून कारकीर्द घडवायला आवडेल. तशी संधी मिळाली तर मी त्याबाबत सकारात्मक विचार करेन.’’