मुंबई हॉकीतील वाद संपण्याची कोणतीच चिन्हे सध्या दिसत नाहीत. भारतीय हॉकी महासंघाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबई संघाला सरावासाठी मैदान देण्यास मुंबई हॉकी असोसिएशनकडून टाळाटाळ होत असल्यामुळे अखेर ऑलिम्पियन हॉकीपटू, विविध क्लब्सचे प्रतिनिधी आणि पंच या सर्वानी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात गुरुवारी सकाळी आठ वाजता ही भेट होणार असून मुंबईतील हॉकी खेळासंदर्भातील समस्यांबाबत हे सर्व जण गाऱ्हाणे मांडणार आहेत.
बंगळुरू येथे एप्रिलअखेरीस होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाला सराव करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागण्यात आली होती. क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभागाचे उपसंचालक एन. बी. मोटे यांनी हे मैदान सरावासाठी देण्यात यावे, अशी विनंती एका पत्राद्वारे मुंबई हॉकी असोसिएशनला केली होती. पण सराव करण्यासाठी मुंबई संघातील ५० ते ६० खेळाडू महिंद्रा स्टेडियमवर पोहोचले, त्यावेळी मैदानाला टाळे ठोकल्याचे त्यांच्या ध्यानात आले. त्यानंतर त्यांनी मैदानाबाहेरच्या जागेवर सराव केला होता. मुंबई हॉकी असोसिएशनच्या कार्यकारिणीनेच त्यांना हे मैदान सरावासाठी देऊ नये, अशी आडमूठी भूमिका घेतली होती. पण नंतर हे प्रकरण आपल्यावरच उलटेल, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी खेळाडूंना मैदानावर सराव करण्याची परवानगी दिली. पण दोन-तीन दिवसांनंतर मुंबई हॉकी असोसिएशनने नवी शक्कल लढवत पुन्हा खेळाडूंना परवानगी नाकारली होती. ११ एप्रिलपासून हॉकी इंडियाची राष्ट्रीय स्पर्धा होत असल्यामुळे खेळाडूंना हे मैदान देता येणार नाही, असे कारण त्यांनी पुढे केले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी माजी खेळाडूंनी थेट अजित पवार यांचीच भेट घेण्याचे ठरवले आहे.
याविषयी माजी ऑलिम्पियन आणि भारताचे माजी प्रशिक्षक जोकिम काव्र्हालो म्हणाले, ‘‘राज्य सरकारने हे मैदान मुंबई हॉकी असोसिएशनला भाडेतत्वावर चालविण्यासाठी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीनंतर त्यांनी हे मैदान खेळाडूंना उपलब्ध करून द्यायचे होते. पण वारंवार ते खेळाडूंच्या सरावात विघ्न आणत आहेत. त्यामुळेच काही माजी खेळाडूंसह आम्ही अजित पवार यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा