भारतीय पुरूष हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने ब्रिटनला ३-१ ने पराभूत केलं. भारतीय संघ सुवर्णपदकापासून दोन विजय दूर आहे. जवळपास ४ दशकानंतर भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून १-७ ने पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केलं. ‘अ’ गटातील ५ पैकी ४ सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. आता उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे. बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला ३-१ अशी धूळ चारत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी हे दोन संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत. स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी उल्लेखनीय आहे. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडशी अटीतटीचा सामना झाला. सामना २-२ ने बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआउटमध्ये निर्णय लागला.

भारताने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली. दिलप्रीत सिंहने ७ व्या मिनिटाला गोल झळकावत १-० ने आघाडी घेतली. त्यानंतर गुरजंत सिंहने १६ व्या मिनिटाला गोल केला आणि २-० ने आघाडी मिळवून दिली. ब्रिटनने ४५ व्या मिनिटाला कॉर्नरच्या माध्यमातून गोल केला आणि दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. सॅम्युअल इआनने गोल केला. त्यानंतर ५४ व्या मिनिटाला मनप्रीतला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं आणि ब्रिटनला आणखी एक कॉर्नर मिळाला. मात्र भारताचा गोलरक्षक श्रीजेशने गोल अडवला आणि भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. भारताने आक्रमक खेळी केली आणि ५७ व्या मिनिटाला हार्दीक सिंहने गोल केला. या गोलसह भारताने ३-१ अशी आघाडी मिळवून विजय मिळवला.

१९२८ मध्ये भारताच्या हॉकी संघाने अम्सटर्डममध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्ण पदक पटकावलं. भारताने ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झर्लंड आणि अंतिम सामन्यात नेदरलँडला पराभूत केलं होतं. त्यानंतर १९३२ मध्ये भारताने अमेरिकेला २४-१ ने विक्रमी फरकाने पराभूत केलं होतं. ही विजय आजही स्मरणात आहे. बर्लिन ऑलिम्पिक १९३६ स्पर्धेमध्ये भारताने जर्मनीला ८-१ ने पराभूत केलं. त्यावेळेस भारत ब्रिटिश इंडियाकडून स्पर्धेत खेळत होता.

 

 

 

स्वातंत्र्योत्तर काळात ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारताचा दबदबा दिसून आला. जागतिक महायुद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा १९४८ मध्ये लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने हॉकीत सुवर्ण पदक पटकावलं. स्वातंत्र्यानंतर भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक होतं. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दुसरं सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर १९५६ मध्येही भारताने सुवर्ण पदक पटकावलं. मात्र १९६० मध्ये भारतीय हॉकी संघाला पराभव सहन करावा लागला आणि रजत पदकावर समाधान मानावं लागलं. भारताने १९६४ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा हॉकीत सुवर्ण पदक पटकावत पुनरागमन केलं. १९६८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी टीमला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर १९७२ ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताला कांस्य पदक मिळालं. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. भारताचं हे हॉकीमधलं शेवटचं पदक होतं.

Story img Loader