जवळपास दोन वर्षे भारतीय बॉक्सिंग संघटनेवर असलेली ऑलिम्पिक बंदी आता उठण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बॉक्सिंग इंडियाच्या रूपाने भारतात बॉक्सिंगची नवी चळवळ उभी राहणार आहे. बॉक्सिंग इंडियाची निवडणूक गुरुवारी मुंबईत होणार असून त्यानंतर बॉक्सिंग इंडियाला जागतिक संघटनेकडून मान्यता मिळणार आहे. त्यामुळे भारतीय बॉक्सर्सना आशियाई स्पर्धेत भारताच्या झेंडय़ाखाली प्रतिनिधित्व करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) बॉक्सिंग इंडियाला निवडणूक आयोजित करण्याची परवानगी दिली असून गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीत बॉक्सिंग इंडियाचे भवितव्य ठरणार आहे. एआयबीएचे कायदेशीर व्यवस्थापक क्लिडोना गाय आणि भारताचे एआयबीएमधील प्रतिनिधी किशन नरसी हे या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून, तर निवडणूक अधिकारी म्हणून निवृत्त न्यायाधीश डी. के. देशमुख हे काम पाहणार आहेत. निवडणुकीत गैरव्यवहार झाला आहे असे आरोप होऊ नयेत, यासाठी निवडणुकीचे व्हिडीयो चित्रण केले जाणार आहे.
‘‘निवडणुकीत पारदर्शकपणा आणण्यासाठी आम्ही हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहोत,’’ असे बॉक्सिंग इंडियाचे सदस्य उदित सेठ यांनी सांगितले.
अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार रिंगणात उभे असल्यामुळे संदीप जजोदिया हे बिनविरोध निवडून आले आहेत. महासचिवपदासाठी मात्र चुरशीची लढत रंगणार आहे. महाराष्ट्राचे जय कवळी, दिल्लीचे रोहित जैन आणि हरियाणाचे राकेश ठाकरन यांच्यात ही चुरस रंगणार
आहे.
खजिनदारपदासाठीही तिरंगी लढत असून मणिपूरचे खोईबी सलाम, आसामचे हेमंता कुमार कलिता आणि त्रिपुराचे डॉ. रुपक देबरॉय हे या पदासाठी रिंगणात उभे आहेत.
या निवडणुकीसाठी प्रत्येक राज्य असोसिएशनमधील दोन जणांना मतदान करण्याची संधी मिळणार असून एकूण ६३ जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्रातून जय कवळी आणि भारतकुमार व्हावळ हे मतदानाचा हक्क बजावतील. कोणतेही विघ्न न येता पारदर्शकपणे या निवडणुका झाल्या आणि एआयबीएच्या दोन्ही निरीक्षकांनी बॉक्सिंग इंडियाच्या बाजूने अहवाल दिल्यास, एआयबीएकडून बॉक्सिंग इंडियाला तात्पुरती मान्यता मिळणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात कोरिया येथे होणाऱ्या एआयबीएच्या सभेत बॉक्सिंग इंडियाला कायमस्वरूपी मान्यता देण्यात येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा