डायव्हिंगसाठी भरपूर नैपुण्य सोलापुरात आहे, मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा येथे अभाव आहे. अशा सुविधा मिळाल्या, तर निश्चितपणे ऑलिम्पिकपदकविजेता खेळाडू सोलापूर येथे घडेल, असे डायव्हिंगचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीला सांगितले.
सोलापूरच्या खेळाडूंनी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या राज्य जलतरण स्पर्धेतील डायव्हिंगमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांच्या बिल्वा गिरम (१४ वर्षे), ओम अवस्थी (१४ वर्षे मुले), ऐश्वर्या भोसले (१७ वर्षे), आदित्य गिरम (१७ वर्षे मुले) यांनी वैयक्तिक विजेतेपद मिळविले. श्री अ‍ॅक्वेटिक क्लबचे हे खेळाडू सोलापूर येथील वीर सावरकर तलावावर शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
सोलापूरच्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत डायव्हिंगमध्ये दोनशेहून अधिक पदकांची लयलूट केली आहे. एवढेच नव्हे तर आशियाई स्तरावरही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीविषयी शेटे यांनी सांगितले, सावरकर तलावावर दररोज पाच ते वीस वर्षांपर्यंतच्या वयोगटातील ६० ते ७० खेळाडू डायव्हिंगचा सराव करतात. स्प्रिंगबोर्ड व हायबोर्ड प्रकाराचा हे खेळाडू दररोज दोन ते तीन तास सराव करतात. त्याचबरोबर लवचिकता, हातापायाचे पूरक व्यायामही आम्ही करून घेतो. सुरुवातीला आमचे खेळाडू लाकडी बोर्डवरच सराव करीत असत. तो तुटल्यानंतर आता फायबरचे बोर्डावर सराव केला जातो. अशा बोर्डवरच सराव करीत आमच्या तलावावरील यशवंत व यशस्विनी नारायण पेठकर, कृष्णा पाटील, यतीन शहा, रोहन सामरानी, जागृती सातारकर, आदित्य गिरम, सृष्टी शेटे आदी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखविली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल यश मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डायव्हिंग बोर्ड्सची आवश्यकता असते. या सुविधांबाबत आम्ही राज्य शासनाकडे विचारणा केली आहे. राज्यात काही ठिकाणी शासनाच्या क्रीडा संकुलात असे बोर्ड्स पडून आहेत. हे बोर्ड्स आम्हाला द्यावे अशीही विनंती आम्ही केली आहे. येथील महापालिकेतर्फे नेहमीच आम्हाला हा तलाव नेहमीच सरावासाठी उपलब्ध केला जातो. आम्ही पालिकेलाही आंतरराष्ट्रीय सुविधा देण्याविषयी विनंती केली आहे. असे बोर्ड्स उपलब्ध झाले तर निश्चितपणे आमच्या खेळाडूंची कामगिरी अधिक चांगली होईल असे शेटे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, महापालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाचा तलाव बांधण्याचे कामही सहासात वर्षांपूर्वीच हाती घेतले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण झाले, तर आमच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील.
खेळाडूंच्या खर्चाचा आर्थिक भार कोण उचलतो असे विचारले असता शेटे यांनी सांगितले, राज्य व राष्ट्रीय स्पर्धासाठी खेळाडूंचे पालकच बऱ्याच वेळा खर्च करीत असतात. काही वेळा शहरातील दानशूर संस्था व उद्योजकांकडूनही खेळाडूंना थोडेफार साहाय्य केले जाते. मात्र येथे डायव्हिंगसाठी असलेले नैपुण्य लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यांच्याकरिता चांगली योजना अमलात आणली पाहिजे. राज्य हौशी जलतरण संघटनेवर नव्याने निवडून आलेले सरचिटणीस झुबिन अमेरिया हे आमच्या शहराचे असल्यामुळे त्यांच्यामार्फत राज्य संघटनेकडेही या खेळाडूंसाठी प्रशिक्षण व अन्य साहाय्याची योजना सादर करणार आहोत.