Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये रविवारी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता दिग्गज कुस्तीपटू रवी दहियाचे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. ५७ किलो वजनी गटात रवी दहियाला आतिश तोडकरने पराभूत केले. आतिशने दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये अव्वल भारतीय कुस्तीपटूला हरवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रवी दहिया नुकताच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि इतर प्रशिक्षकांविरुद्ध कुस्तीपटूंच्या आंदोलनात सहभागी झाला होता.
महाराष्ट्राच्या आतिश तोडकरने ५७ किलो वजनी गटात २०-८ अशी आघाडी घेत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्याचा पराभव केला. रवी दहिया हा ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता आहे. अशा स्थितीत रवी दहिया याचा हा पराभव खूप मोठा अपसेट मानला जात आहे. दहिया, ज्याला त्याच्या जबरदस्त कौशल्य आणि तग धरण्याबद्दल प्रेमाने ‘द मशिन’ म्हटले जाते, त्याला महाराष्ट्राच्या या पठ्ठ्याने चीतपट करत अस्मान दाखवले.
आतिश तोडकरकडून अशा प्रकारच्या प्रतिकाराची अपेक्षा नव्हती. ज्यांनी दहियाची कुस्ती पाहिली आहे त्यांना माहित आहे की दहियाकडून दोन गुण घेणे देखील भारतीय कुस्तीपटूंसाठी मोठे अवघड काम आहे. रविवारी, आतिश तोडकरने अशी काय चमकदार कामगिरी केली की त्याने थेट ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला पाणी पाजले. दर्जेदार चाली करून केवळ गुणच मिळवले नाहीत तर खूप मोठ्या फरकाने हरवले.
दुखापतीमुळे दहियाने यंदाच्या कुठल्याही स्पर्धेत त्याने भाग घेतला नव्हता
उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे रवी दहियाने या वर्षीच्या कुठल्याही स्पर्धेत भाग घेतला नव्हता. ACL (एंटेरिअर क्रूसिएट लिगामेंट) आणि MCL (मेडियल कोलॅटरल लिगामेंट) या आजारामुळे त्याने स्पर्धा केली नाही. विजयाच्या आशेने तो चाचणीत उतरला होता, पण पराभवाला सामोरे जावे लागले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत रवीला अद्याप पदक जिंकता आलेले नाही
रवीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर नाव कोरले होते. २०१९च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याला कांस्यपदक मिळाले होते. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत रवीला अद्याप पदक जिंकता आलेले नाही. यावेळीही त्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही.
बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट थेट आशियाई खेळ खेळतील
माहितीसाठी की, रवी दहिया दुखापतीतून पूर्णपणे बरा होऊ शकला नाही, परंतु आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याला चाचण्या खेळाव्या लागल्या. आता चाचणीतील पराभवामुळे तो आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. दुसरीकडे स्टार कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी चाचण्यांमध्ये भाग घेतला नाही. हे दोन्ही दिग्गज आशियाई क्रीडा स्पर्धेत थेट खेळताना दिसणार आहेत.