भारतीय महिला हॉकी संघाला ऑलिम्पिक प्रवेशासाठी आता केवळ एकच अडथळा ओलांडावा लागणार आहे. त्यांना जागतिक हॉकी लीगमध्ये शनिवारी जपानविरुद्ध विजय प्राप्त करावा लागेल.
भारतीय महिला संघाने यापूर्वी १९८०मध्ये मॉस्को येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळविले होते, मात्र त्यानंतर त्यांना प्रत्येक वेळी पात्रता फेरी पार करण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच येथे आलेली सुवर्णसंधी साध्य करण्यासाठी त्यांना सर्वोच्च कामगिरी करावी लागणार आहे.
‘‘जागतिक लीगमध्ये आम्ही यापूर्वी कधीही एवढी चांगली कामगिरी केलेली नाही. त्यातही ३६ वर्षांनी ऑलिम्पिक प्रवेशाच्या उंबरठय़ावर आम्ही पोहोचलो आहोत. हा उंबरठा पार करण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडूला उत्सुकता वाटत आहे. जपानविरुद्ध गोल करण्यासाठी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ उठविण्याचे आमचे ध्येय राहील,’’ असे भारतीय संघाचे प्रशिक्षक मथायस अ‍ॅहरेन्स यांनी सांगितले.
व्हॅलेंसिया येथे झालेल्या जागतिक लीगमधून जर्मनी, इंग्लंड व चीन यांनी ऑलिम्पिकचे स्थान निश्चित केले आहे. विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या अर्जेटिनाला कांस्यपदकाच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला व त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मात्र दक्षिण कोरियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये यापूर्वीच स्थान मिळविले आहे. अर्जेन्टिनाच्या ऑलिम्पिक प्रवेशाच्या आशा उंचावल्या आहेत. व्हॅलेंसिया येथे पाचवे स्थान मिळविणाऱ्या अमेरिकेलाही पॅनअमेरिकन स्पर्धेद्वारे ही संधी आहे.
इटलीविरुद्ध येथे सडनडेथद्वारा मिळालेल्या विजयाबद्दल मथायस यांनी सांगितले, ‘‘आम्ही जपानविरुद्ध विजय मिळविण्यासाठीच खेळणार आहोत. गोल करण्यात आम्ही कोठे कमी पडतो याचा आम्ही बारकाईने अभ्यास केला आहे. त्या चुका येथे उद्या होणार नाहीत, याची काळजी आम्ही घेणार आहोत. गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत आम्ही जपानला हरविले होते. त्यामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावलेले आहे.’’
‘‘आम्हाला त्यांच्या खेळाडूंचे बारकावे माहीत आहेत. त्यांनाही आमच्या खेळाचा परिचय आहे. साहजिकच हा सामना रंगतदार होईल. मात्र या सामन्यात आमचेच वर्चस्व राहील. आमच्या खेळाडू गोल करण्याच्या संधी चांगल्या रीतीने निर्माण करीत आहेत. मात्र त्याचे गोलात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शैलीत ते कमी पडत आहेत. ही त्रुटी आता दिसणार नाही,’’ असे मथायस यांनी सांगितले.

Story img Loader