प्रथमच स्पर्धेत भाग घेण्याची संधी
विविध देशांमध्ये निर्वासित म्हणून वास्तव्य करीत असलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) दिलासा दिला आहे. या खेळाडूंना प्रथमच ऑलिम्पिकचे प्रवेशद्वार खुले झाले आहे.
आयओसीचे मुख्य थॉमस बॅच यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत ही घोषणा केली. त्यामुळे ऑलिम्पिक व पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेण्याचा अधिकार निर्वासित असलेल्या खेळाडूंना मिळणार आहे. सदस्य देशांनी निर्वासितांमधील क्रीडा नैपुण्याचा शोध घेत त्यांचा विकास करावा, असे आवाहनही बॅच यांनी केले.
निर्वासित खेळाडूंना आपल्या देशाच्या ध्वजाखाली भाग घेताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन आयओसीने या खेळाडूंना भाग घेण्यास मुभा दिली आहे. या खेळाडूंना स्वतंत्र रीत्या सहभागी होता येणार आहे.
संयुक्त राष्ट्राच्या निर्वासित विभागाचे प्रमुख अन्तोनिओ गुटेरेस यांनी सांगितले, जगात वीस दशलक्षपेक्षा जास्त निर्वासित लोक आहेत व दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत आहे.
या लोकांना त्यांच्यामधील गुणांना वाव मिळावा. त्यांची क्रीडा क्षेत्रातील स्वप्ने साकार व्हावी यासाठी आयओसीने दोन दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला आहे, असे सांगून बॅच म्हणाले, ऑलिम्पिकप्रमाणेच विविध खेळांच्या अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्येही या खेळाडूंना संधी देण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
निर्वासितांना ऑलिम्पिक महासंघाचा दिलासा
या खेळाडूंना प्रथमच ऑलिम्पिकचे प्रवेशद्वार खुले झाले आहे.
Written by रत्नाकर पवार
First published on: 28-10-2015 at 02:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympic federation relief to refugees