भारतात तिरंदाजीकरिता विपुल प्रमाणात नैपुण्य उपलब्ध आहे मात्र ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी त्यांना आणखी आठ वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल, असे भारतीय तिरंदाजी संघाचे कोरियन प्रशिक्षक लिम चेई वुंग यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीला सांगितले.
भारतीय संघ बँकॉक येथे शनिवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई ग्रां.प्रि स्पर्धेत सहभागी होणार आहे. या संघाचे सराव शिबिर येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूट येथे होते. या स्पर्धेकरिता वुंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंनी कसून सराव केला.
भारतीय खेळाडू जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये चमकतात मात्र ऑलिम्पिकमध्ये त्यांची पीछेहाट होते या मागचे कारण काय? असे विचारले असता वँुग म्हणाले, मी अजूनही भारतात तिरंदाजी अकादमींचा सखोल अभ्यास केलेला नाही. मात्र गेली तीनचार वर्षे आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंची शैली पाहिलेली आहे. त्यांच्याकडे चांगले नैपुण्य आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी मानसिक कणखरता आवश्यक आहे. राहुल बॅनर्जी, एल.बोम्बयला देवी, डोला बॅनर्जी यांच्याकडे पदक मिळविण्याची क्षमता आहे. मात्र काही वेळा हे खेळाडू विनाकारण दडपण घेतात असे माझ्या लक्षात आले आहे.
आगामी ऑलिम्पिककरिता काय नियोजन केले आहे असे विचारले असता वुंग यांनी सांगितले, ऑलिम्पिक पात्रता निकष हा सगळ्यात महत्त्वाचा अडथळा असतो. तो पार केला की निम्मे यश मिळाल्यासारखेच आहे. २०१६ च्या ऑलिम्पिककरिता आगामी दोन वर्षांमध्ये विविध जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करण्यावर आमचा भर राहील. भारतीय तिरंदाजी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मी सविस्तर चर्चा करून आगामी दोन-अडीच वर्षांचे नियोजन केले आहे. परदेशातील स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरे यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहत. संभाव्य खेळाडूंची निवड करीत त्यांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, फिजिओ, मसाजिस्ट आदी सुविधांकरिता केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.
तिरंदाजीकरिता येथे पुष्कळ नैपुण्य उपलब्ध आहे. मात्र या खेळाचा अपेक्षेइतका प्रसार झालेला नाही. तसेच अनेक ठिकाणी आवश्यक तेवढय़ा अव्वल दर्जाच्या सुविधांची कमतरता आहे असे माझ्या लक्षात आले आहे. या संदर्भात मी भारतीय तिरंदाजी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
माझ्या सूचनांबाबत त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवीत त्यानुसार योग्य ती पावले उचलण्याचे मान्य केले आहे असेही वुंग यांनी सांगितले.