नवी दिल्ली : दोन ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि थॉमस चषक विजेत्या संघात सहभागी असलेला एच एस प्रणॉय मंगळवारी जागतिक बॅडमिंटन महासंघाकडून (बीडब्ल्यूएफ) जागतिक क्रमवारीत महिला आणि पुरुष एकेरीत एका स्थानाच्या बढतीसह अनुक्रमे पाचव्या आणि १२व्या स्थानी पोहोचले.
ऑगस्टमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर दुखापतीमुळे स्पर्धात्मक बॅडमिंटनपासून दूर झालेल्या सिंधूचे २६ स्पर्धात ८७२१८ गुण आहेत. तीन वर्षांनंतर सिंधूने पुन्हा अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले. पुरुष एकेरीत प्रणॉयने डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना क्रमवारीत आपली आगेकूच कायम राखली. प्रणॉयचे २६ स्पर्धात ६४३३० गुण आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेता लक्ष्य सेन आणि कांस्यपदक विजेता किदम्बी श्रीकांत अनुक्रमे आठव्या व ११व्या स्थानी आहेत.
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती जोडी पुरुष दुहेरीत आठव्या स्थानावर कायम आहे. एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला पुरुष दुहेरी क्रमवारीत दोन स्थानांच्या फायद्यासह १९व्या स्थानी पोहोचली आहे. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरी जोडी २७व्या स्थानावर आहे. सायना नेहवाल महिला एकेरी क्रमवारीत एका स्थानाच्या घसरणीसह ३३व्या स्थानी आहे.