खांद्याच्या दुखापतीमुळे दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटू सुशील कुमारला विश्व अजिंक्यपद स्पध्रेतून माघार घ्यावी लागली आहे. या स्पध्रेसाठी ६-७ जुलैदरम्यान सराव शिबिर होणार होते आणि त्यात सहभाग न घेण्याचा निर्णय सुशीलने घेतला आहे. ७ ते १२ सप्टेंबर या कालावधीत लास वेगास येथे विश्व अजिंक्यपद स्पर्धा होणार असून २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पध्रेसाठी ही पहिली पात्रता फेरी होती.
‘‘सराव करताना खांद्याला दुखापत झाली. त्यामुळेच आगामी निवड शिबिरात सहभाग घेऊ शकत नाही. याचा अर्थ नियमाप्रमाणे मला ऑलिम्पिकसाठीच्या पहिल्या पात्रता स्पध्रेत म्हणजेच विश्व अजिंक्यपद स्पध्रेत खेळता येणार नाही. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या दुखापतीमुळे किती काळ विश्रांती घ्यावी लागेल, याची कल्पना नाही,’’ अशी माहिती सुशीलने दिली.
या स्पध्रेनंतर ऑलिम्पिकसाठी सहा पात्रता स्पर्धाना मार्च २०१६ पासून सुरुवात होणार आहे. सुशील पुढे म्हणाला, ‘‘ दुखापत जास्त गंभीर नसली तरी कोणताही धोका पत्करायचा नाही. अर्ध तंदुरुस्त असताना स्पध्रेत सहभाग घेणे योग्य नाही. रिओ ऑलिम्पिकसाठी पूर्वीच्या पात्रता फेरीत सहभाग घेईन आणि त्यासाठी कठोर परिश्रम घेणार.’’

नरसिंगला संधी
सुशीलच्या या दुखापतीमुळे मात्र मुंबईचा कुस्तीपटू नरसिंग यादवला विश्व अजिंक्यपद स्पध्रेत खेळण्याची संधी मिळणार आहे. हे दोन्ही खेळाडू ७४ किलो वजनी गटातून उतरणार होते आणि विश्व अजिंक्यपद स्पध्रेत या दोघांपैकी एकालाच संधी मिळणार असल्याने त्यांच्यात सामनाही होणार होता.

Story img Loader