ऑलिम्पिक पदक हे माझ्यासाठी ग्रँडस्लॅम विजेतेपदापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे आणि रिओ येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मी किमान कांस्यपदक तरी मिळवीन, असा आत्मविश्वास भारताचा ज्येष्ठ टेनिसपटू लिअँडर पेस याने येथे सांगितले.
डेक्कन जिमखाना क्लब येथे सुरू असलेल्या प्रीमियर टेनिस लीगच्या निमित्ताने बुधवारी प्रदर्शनीय सामन्यात पेस सहभागी होणार आहे. पेस याने मंगळवारी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. तो म्हणाला, अटलांटा येथे १९९६ मध्ये मी ऑलिम्पिक कांस्यपदक मिळविले होते. त्या वेळी तिरंगा फडकताना मला खूप अभिमान वाटत होता. त्यानंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये मी सहभागी झालो आहे. आता पुन्हा रिओ येथे देशाचा तिरंगा फडकताना मला पाहायचा आहे. मी नेहमीच देशासाठी खेळलो आहे आणि देशासाठी खेळताना मला खूपच अभिमान वाटतो. रिओ येथे केवळ प्रतिनिधित्व करण्याच्या हेतूने न खेळता पुन्हा किमान कांस्यपदक मिळविण्यासाठीच मी उतरणार आहे. त्यासाठी मी पुढील वर्षी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती यावर जास्त भर देणार आहे.
ग्रँडस्लॅममध्ये रावेनच्या साथीत खेळणार
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील पुरुषांच्या दुहेरीत मी दक्षिण आफ्रिकेचा रावेन क्लासेन याच्या साथीत खेळणार आहे असे सांगून पेस म्हणाला, क्लासेन याने गतवर्षी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील दुहेरीत अव्वल दर्जाचे यश मिळविले आहे. चेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपानेक याला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याने पुढील मोसमात केवळ एकेरीत भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी मी क्लासेन याची निवड केली आहे. तो वेगवान सव्‍‌र्हिस व बॅकहँड परतीचे फटके याबाबत माहीर आहे. मी फोरहँडवर जास्त लक्ष देत असतो. एकमेकांचे गुणदोष ओळखून त्याप्रमाणे खेळ करणाऱ्या खेळाडूलाच मी सहकारी म्हणून प्राधान्य देत असतो.
क्लासेन हा पेसचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील गेल्या ३० वर्षांमधील दुहेरीचा ९९वा सहकारी आहे. या सहकाऱ्यांपैकी कोणता सहकारी तुला जास्त भावला असे विचारले असता पेस म्हणाला, मला लाभलेले प्रत्येक सहकारी अतिशय तोलामोलाचे होते. तरीही महेश भूपती, राडेक स्टेपानेक, मार्टिना नवरतिलोवा, कारा ब्लेक यांच्याबरोबर खेळताना मला खेळाचा निखळ आनंद मिळाला. मार्टिना हिच्याकडून खूप काही शिकावयास मिळाले. एवढी महान खेळाडू असूनही ती सतत जमिनीवरच असते. अन्य देशांच्या तुलनेत चेक प्रजासत्ताकचे खेळाडू खूप कष्टाळू, जिद्दी, बुद्धिवान व उत्तम सहकार्य करणारे असतात. त्यामुळे दुहेरीतील सहकारी निवडताना मी नेहमी या देशाच्या खेळाडूंना प्राधान्य देतो. मिश्रदुहेरीत मी एका चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूची निवड केली आहे, मात्र त्याची औपचारिक घोषणा मी थोडय़ा दिवसांनी करणार आहे.
वेगवेगळय़ा लीग स्पर्धा भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंसाठी चांगले व्यासपीठ आहे. त्याचा फायदा घेत त्यांनी अनुभव वृद्धिंगत करावा. लीगचा उपक्रम स्तुत्य आहे, मात्र या स्पर्धाच्या संयोजनात सातत्य पाहिजे.
या स्पर्धामधून फ्रँचाईजी मालकांना गुंतवणुकीद्वारे किती मोबदला, प्रसिद्धी व समाधान मिळते यावरच या लीगचे भवितव्य अवलंबून आहे असेही पेस याने सांगितले.
तो म्हणाला, गेल्या अकरा वर्षांमध्ये मी एकेरीत खेळलो नव्हतो. चंडीगढ येथे नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत मी एकेरीचा सामना खेळलो व मला खूप आनंद झाला. रिओ ऑलिम्पिकसाठी पुन्हा एकेरीच्या सरावावर लक्ष केंद्रित करणार आहे.

Story img Loader