जगातील सर्वोत्तम जलतरणपटू आणि १८ सुवर्णपदकांसह तब्बल २२ ऑलिम्पिक पदके जिंकणारा ‘देवमासा’ मायकेल फेल्प्स पुन्हा एकदा तरणतलावात आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. २०१२ लंडन ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच अमेरिकेचा महान जलतरणपटू फेल्प्स २४ ते २६ एप्रिलदरम्यान मेसा, अरिझ येथे होणाऱ्या एरिना ग्रां. प्रि. स्पर्धेत सहभागी होणार आहे. यासह फेल्प्सने २०१६ रिओ डी जानेरो ऑलिम्पिकमध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.
‘‘५० आणि १०० मीटर फ्रीस्टाइल तसेच १०० मीटर बटरफ्लाय या तीन प्रकारात फेल्प्स सहभागी होणार आहे. जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच स्पर्धेसाठी पाण्यात उतरून फेल्प्स भविष्यकालीन योजनांचा अंदाज घेणार आहे. त्यामुळे फेल्प्स पूर्ण जोशाने पुनरागमन करीत आहे, असे सांगणे चुकीचे ठरेल,’’ असे फेल्प्सचे प्रशिक्षक बॉब बॉवमेन यांनी सांगितले.
अमेरिकेच्या उत्तेजकविरोधी कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर फेल्प्स पुन्हा एकदा सरावाकडे वळला आहे. स्पर्धात्मक प्रवेशासाठी सहा महिने प्रतीक्षा करण्याचा अमेरिकेच्या उत्तेजकविरोधी संस्थेचा निकष फेल्प्सने पार केला आहे. ‘‘नॉर्थ बाल्टिमोर अॅक्वेटिक क्लबमध्ये फेल्प्स सोमवार ते शुक्रवार सराव करीत आहे. पण तो पूर्वीसारखा फॉर्मात नाही. गेल्या सप्टेंबरनंतर त्याला हळूहळू सूर गवसत आहे. सरावात तो कठोर मेहनत घेत आहे,’’ असेही बोवमेन यांनी सांगितले. २०१२ लंडन ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेतल्यावर फेल्प्स जलतरण शाळा उघडणे, पुरस्कर्त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होणे तसेच गोल्फ खेळणे आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांत सहभागी होण्यात व्यग्र होता.
देवमासा परततोय!
जगातील सर्वोत्तम जलतरणपटू आणि १८ सुवर्णपदकांसह तब्बल २२ ऑलिम्पिक पदके जिंकणारा ‘देवमासा’ मायकेल फेल्प्स पुन्हा एकदा तरणतलावात आपला
First published on: 17-04-2014 at 12:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympic swimming legend michael phelps to make comeback