भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करुन उपांत्यफेरीमध्ये धडक मारलीय. भारतीय संघाने तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला १-० ने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केलाय. या विजयानंतर सोशल मीडियावर शुभेच्छा, फोटो आणि व्हिडीओंचा पाऊस पडत असतानाच भारतीय पुरुष संघाने रविवारी आणि महिला संघाने आज मिळवलेले विजय किती महत्वाचे आहे हे दर्शवून देणारे सेलिब्रेशनचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. भारतीय महिलांचा विजय साजरा केला जात अशतानाच दुसरीकडे पुरुषांच्या संघाने उपांत्यफेरीत धडक मारल्यानंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कव्हर करणाऱ्या दोन हिंदी समालोचकांचा. मात्र महिलांच्या विजयानंतर कालच भारतीय पुरुषांनी विजय मिळवल्यानंतर हिंदी समालोचकांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> Olympics 2020 Hockey : भारत सरकारने Meme शेअर करत केलं भारतीय महिलांचं अभिनंदन

भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी ब्रिटनवर ३-१ असा शानदार विजय मिळवत ४९ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सामना संपल्याची शिटी वाजवल्यानंतर भारतीय हॉकीपटूंनी जल्लोष साजरा केला. हा जल्लोष केवळ मैदानातच झाला असं नाही तर भारतीयांना हिंदीमध्ये सामन्यातील घडामोडी ऐकवणाऱ्या समालोचकांना आपले अश्रू अनावर झाले. भारताने विजय मिळवल्यानंतर भारताने इतिहास घडवलाय म्हणून खाली बसून डोळे पुसू लागले. हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असून हा व्हिडीओ मुंबईतील असल्याचं सांगण्यात येत आहे.

नक्की पाहा हे १० फोटो >> एक.. दोन.. तीन.. दे धक्का… भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतरचे मैदानावरील फोटो

असा जिंकला सामना…

भारताच्या यशात दिलप्रीत सिंग (७व्या मिनिटाला), गरुजत सिंग (१६व्या मिनिटाला) आणि हार्दिक सिंग (५७व्या मिनिटाला) यांनी मैदानी गोलची नोंद केली. ब्रिटनकडून सॅम वॉर्डने एकमेव गोलची नोंद केली. येत्या मंगळवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची विश्वविजेत्या बेल्जियमशी गाठ पडणार आहे. बेल्जियमने उपांत्यपूर्व सामन्यात स्पेनला ३-१ असे हरवून उपांत्य फेरीत स्थान मिळवले. दुसरी उपांत्य लढत ऑस्ट्रेलिया-जर्मनीमध्ये होणार आहे. मेजर ध्यानचंद, बलबिर सिंग यांसारख्या मातब्बर हॉकीपटूंमुळे आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने अखेरचे सोनेरी यश मॉस्कोमध्ये १९८०मध्ये मिळवले होते. परंतु त्यावेळी फक्त सहा संघांच्या समावेशामुळे उपांत्य लढत नव्हती. त्यामुळे त्याआधी १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारताचा २-० असा पराभव केल्याने भारताची वाटचाल खंडित झाली होती.

भारताच्या विजयानंतर कर्णधार म्हणाला…

“ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वीच यंदा आम्ही उपांत्य फेरीपर्यंत नक्कीच धडक मारू, याची प्रत्येकाला खात्री होती. या विश्वासाचे मैदानावर कामगिरीत रुपांतर केल्याचा आनंद आहे. मात्र आमचे अंतिम लक्ष्य अद्याप दूर असून बेल्जियमला नमवण्यासाठी सर्वस्व पणाला लावू,” असं मत भारताचा कर्णधार मनप्रीत सिंग याने व्यक्त केलंय.

Story img Loader