Olympics 2024 day 6 India in Medal Race : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गुरुवारी (१ ऑगस्ट) भारताला तीन पदकांची आशा आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकाराची आज अंतिम फेरी खेळवली जाणार आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे याने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली असून आज दुपारी १ वाजता त्याच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. स्वप्नीलकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. तसेच याच खेळाच्या महिलांच्या श्रेणीत शिफ्ट कौर समारा आणि अंजुम मौदगिल या भारताच्या दोन नेमबाज आज पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत. तर भारताची स्टार बॉक्सर निखत झरीन ५० किलो वजनी गटात उप-उपांत्य फेरीत खेळणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी (आज) एकूण सुवर्णपदकाचे एकूण १८ सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी तीन स्पर्धामध्ये भारतीय खेळाडू त्यांचं कौशल्य दाखवणार आहेत. त्यामुळे भारताला आज तीन पदकांची अपेक्षा आहे. भारताने आतापर्यंत दोन कांस्य पदकं पटकावली आहेत. भारताला आता रजत व सुवर्णपदकाची आशा आहे. ऑलिम्पिकच्या सुरुवातीच्या टप्प्यात नेमबाजीच्या स्पर्धा होत असून भारताला नेमबाजांकडून अधिक अपेक्षा आहेत.
आज भारताला तीन पदकांची आशा
- नेमबाज स्वप्नील कुसळी पुरुषाच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार
- आकाश दीप, विकास आणि परमजीत सिंह पुरुषांच्या २० किमी चालण्याच्या स्पर्धेतील अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.
- तर, महिलांच्या २० किमी चालण्याच्या स्पर्धेत (अंतिम फेरी) प्रियांका गोस्वामी खेळणार
स्वप्नील कुसळेची अंतिम फेरीत धडक
स्वप्निल कुसळे याने ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात पात्रता फेरीत सातवं स्थान पटकावत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. स्वप्निलने एकूण ५९० गुणांची कमाई केली. स्पर्धा प्रकारातील पहिल्या गुडघे टेकण्याच्या स्थितीतून स्वप्निलने १९८ (९९,९९) गुणांची कमाई केली. त्यानंतर प्रोन पद्धतीत १९७ (९८, ९९) आणि उभे राहून १९५ (९८, ९७) गुणांची कमाई केली.
हे ही वाचा >> Lakshya Sen : ‘करो या मरो’च्या लढतीत लक्ष्य सेनच्या भन्नाट शॉटने चाहते अवाक्, VIDEO होतोय व्हायरल
भारतीय हॉकी संघासमोर बेल्जियमचे आव्हान
उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघासमोर पॅरिस ऑलिम्पिकच्या ‘ब’ गटात गुरुवारी गतविजेत्या बेल्जियमचं आव्हान असणार आहे. यावेळी भारताला आपल्या कामगिरीमधील सातत्य राखणं गरजेचं आहे. भारताने बेल्जिमयचा पराभव केल्यास भारतीय हॉकी संघ पदकाच्या दिशेने एक पाऊल टाकेल.