Virat Kohli on Olympics 2028: तब्बल१२८ वर्षांनंतर क्रिकेट या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) सोमवारी आपल्या १४१व्या सत्रात २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये देशातील सर्वात लोकप्रिय खेळाचा समावेश करण्याची अधिकृत घोषणा केली. २०२८ ऑलिम्पिकमधील क्रिकेट टी२० फॉरमॅटमध्ये खेळले जाईल, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघ सहभागी होतील. क्रिकेट व्यतिरिक्त, आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांनी २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये ध्वज फुटबॉल, बेसबॉल/सॉफ्टबॉल, स्क्वॅश, लॅक्रोस या खेळांचा समावेश करण्याचीही घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्यानंतर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली चर्चेत आहे. एल.ए २८चे क्रीडा संचालक निकोल कॅम्प्रियानी यांनी कोहलीचे कौतुक केले. इटलीचे माजी ऑलिम्पिक विजेता नेमबाज निकोल कॅम्प्रियानी यांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयओसीकडे मागणी करताना कोहलीच्या लोकप्रियतेचा दाखला दिला. एवढेच नाही तर आयओसीच्या अधिकाऱ्यावरील पोस्टमध्ये सुद्धा विराटचा फोटो दिसत आहे.

कॅम्प्रियानी काय म्हणाले?

कॅम्प्रियानी म्हणाले की, “जगभरातील अंदाजे २५० कोटी चाहते असलेल्या विश्वातील दुसऱ्या सर्वात लोकप्रिय खेळाचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.” कॅम्प्रियानी म्हणाले की, “माझा मित्र विराट कोहली जगातील तिसरा सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. त्याचे सोशल मीडियावर ३४ कोटी फॉलोअर्स आहेत, जे ली ब्रॉन जेम्स, टॉम ब्रॅडी, टायगर वुड्स सारख्या खेळाडूंच्या एकूण फॉलोअर्सपेक्षा जास्त आहेत.”

विरोधात फक्त दोन मते पडली

ऑलिम्पिकमध्ये या पाच खेळांचा समावेश लॉस एंजेलिस २०२८ आयोजन समितीने प्रस्तावित केला होता. आयओसीच्या कार्यकारी मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सोमवारी मतदान घेण्यात आले. ९९ आयओसी सदस्यांपैकी फक्त दोन सदस्यांनी या खेळांच्या समावेशाच्या विरोधात मतदान केले. यापूर्वी १९००साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते. जिथे इंग्लंडने फ्रान्सला हरवून सुवर्णपदक जिंकले.

हेही वाचा: AUS vs SL, World Cup: लाबुशेन-जोश इंग्लिशची शानदार खेळी! ऑस्ट्रेलियाने उघडले विजयाचे खाते, श्रीलंकेचा पाच गडी राखून दारूण पराभव

प्रसारण हक्कांच्या किमती वाढतील

अहवालानुसार, २०२४ पॅरिस ऑलिम्पिकचे प्रसारण हक्क १५८ कोटी रुपयांवर गेले आहेत. क्रिकेटचा समावेश केल्यास २०२८ ऑलिम्पिकचे प्रसारण हक्क १५२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्याने या खेळासाठी नवीन दरवाजे उघडणार आहेत. हे न वापरलेल्या जागतिक बाजारपेठेत चांगली कामगिरी करण्याची संधी देईल. या निर्णयामुळे आम्हाला केवळ महत्त्वपूर्ण आर्थिक लाभच मिळणार नाहीत तर आमच्या खेळावरही त्याचा सखोल सकारात्मक परिणाम होईल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympics 2028 virats contribution in including cricket in olympics la sports director said a big thing avw
Show comments