२०१९ साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाला आता फक्त २ वर्ष शिल्लक राहिलेली आहेत. चॅम्पियन्स करंडकात अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून मिळालेली हार पाहता, बीसीसीआयने विश्वचषकाच्या दृष्टीने आपला संघ तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र या संघात महेंद्रसिंह धोनी आणि युवराज सिंह यांच्यासारख्या सिनीअर खेळाडूंना जागा द्यायची की नाही यावरुन गेल्या काही दिवसांमध्ये अनेक चर्चा झडल्या. चाहत्यांसोबत अनेक माजी क्रिकेटपटूंनी धोनीच्या जागी संघात नवीन खेळाडूला संधी मिळायला हवी असं मत व्यक्त केलं होतं.

या वादात आता भारतीय संघातून गेली अनेक वर्ष बाहेर असलेला क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही उडी घेतली आहे. जर २०१९ च्या विश्वचषकात धोनीला आपला जागा राखायची असेल तर मैदानात सतत सर्वोत्तम कामगिरी करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं गंभीरने म्हणलंय. संघात जागा मिळावायची असल्यास कोणत्याही खेळाडूचा मैदानातला फॉर्म, त्याची कामगिरी या गोष्टी लक्षात घेतल्या जाव्यात, तो खेळाडू कितीही मोठा असला तरीही केवळ त्याच्या अनुभवाच्या आधारावर त्याला संघात जागा मिळू शकत नाही, असं म्हणत गंभीरने धोनीवर टीका केली आहे. ‘ESPNCricinfo’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत गंभीरने आपलं मत मांडलं आहे.

यावेळी गौतम गंभीरने निवड समितीच्या निर्णयावरही आश्चर्य व्यक्त केलं. दिनेश कार्तिकवर निवड समितीने अन्याय केल्याचं वक्तव्यही गंभीरने केलं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात दिनेश कार्तिकने चांगली कामगिरी केली होती, मात्र श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत त्याला संघात जागा का मिळू शकली नाही हा मोठा प्रश्नच असल्याचं गंभीरने म्हणलं आहे.

अवश्य वाचा – धोनी हा एकमेव पर्याय नाही, निवड समिती प्रमुखांचा सूचक इशारा

“धोनीने आतापर्यंत भारतीय संघात यष्टीरक्षकाची जागा मोठ्या जबाबदारीने सांभाळलेली आहे. मात्र आगामी विश्वचषकाचा विचार केला असता, केवळ अनुभवाच्या आधारावर धोनीला संघात जागा दिली जाऊ नये. सध्या ऋषभ पंत हा चांगला खेळ करतो आहे. त्याला योग्य वेळी भारतीय संघात संधी दिल्यास आगामी काळात भारतीय संघासाठी तो महत्वाचा खेळाडू ठरु शकतो. याव्यतिरीक्त दिनेश कार्तिक हा देखील यष्टीरक्षकाच्या जागेसाठी चांगला पर्याय ठरु शकतो.”

श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाची निवड करताना निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनीही धोनी हा आगामी विश्वचषकासाठी आपल्यासमोर एकमेव पर्याय नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवण्याची मोठी जबाबदारी धोनीवर असणार आहे. त्यामुळे त्याच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल.

Story img Loader