आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यामध्ये कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा शकील, राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज एस. श्रीशांत यांच्यासह एकूण ३९ व्यक्तींवर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर १६८ साक्षीदारांमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविड यांच्यासह सहमालक शिल्पा शेट्टी आणि राज कुंदरा यांचा समावेश करण्यात आला आहे.
श्रीशांतबरोबर राजस्थानचे खेळाडू अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांचेही नाव या आरोपपत्रामध्ये आहे. त्याचबरोबर सट्टेबाज रमेश व्यास, अश्विनी अगरवाल, दीपक कुमार, सुनील भाटिया आणि फिरोझ फरीद अन्सारी यांच्यासह माजी रणजीपटू बाबूराव यादव यांचा यांना आरोपी ठरवण्यात आले आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनय कुमार खन्ना यांच्याकडे हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. पोलिसांनी सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यामध्ये ३९ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. यापैकी आठ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर २१ आरोपी जामिनावर बाहेर असून उर्वरित दहा आरोपी फरार आहेत. या आरोपींवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे याकलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले असून त्यांच्यावर मोक्काही (महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा) लावण्यात आला आहे.
या आरोपपत्रामध्ये दिल्ली पोलिसांनी खेळाडू, सट्टेबाज आणि अंडरवर्ल्ड गुंडाचे संभाषणाचे पुरावे सादर केले आहेत. यामध्ये दाऊद इब्राहीमचे संभाषण असून जावेद चुटानी आणि पाकिस्तानमधील सुलतान यांचीही संभाषणे आहेत. चुटानी आणि सुलतान यांचीही या आरोपपत्रामध्ये नावे आहेत.
पोलिसांनी सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यापैकी २९५ पानांवर दिल्ली पोलिसांची मुख्यत्वेकरून मदार असेल. कारण या २९५ पानांमध्ये दिल्ली पोलिसांचे सर्व पुरावे असून या पानांवर या प्रकरणाची भिस्त असेल. यामध्ये दिल्ली पोलिसांनी १६८ साक्षीदारांची जबानी नोंदवली असून यामध्ये राहुल द्रविडसह राजस्थान रॉयल्सच्या हरमित सिंग आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांचाही समावेश आहे.
दिल्ली पोलिसांनी १६ मे रोजी श्रीशांत, अंकित आणि चंडिला यांना मुंबईतून अटक केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही अन्य आरोपींची नावे  
जावेद चुटानी, सलमान, मनोज गुड्डेवार, अमित कुमार, जिजू जनार्दन, चंद्रेश पटेल, रमाकांत अगरवाल, राकेश किरण डोळे, मोहम्मद याहय़ा, मनन, अजय गोयल, लव्ह गर्ग, अमित गुप्ता, भुपेंदर नगर, सुनील सक्सेना, सय्यद दुरेझ अहमद, विकास चौधरी, विनोद शर्मा, नितीन जैन, अभिषेक शुक्ला आणि जितेंदर जैन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On cover of fixing chargesheet sree is in ds company