चेन्नई सुपर किंग्सचा स्टार गोलंदाज दीपक चहरने आयपीएल २०२१ च्या ५३ व्या सामन्यानंतर मैदानामध्येच आपल्या प्रेयसीला प्रपोज केलं. चहरने त्याची प्रेयसी जया भारद्वाजला सर्वांसमोर प्रपोज केलं. लाजाळू स्वभाव असणाऱ्या चहरने पंजाब किंग्सविरोधातील सामन्यानंतर गुडघ्यावर बसून जयाला प्रपोज केल्याची फिल्मी स्टाइल मागणीची दृष्य कॅमे्रात टीपली गेली. मात्र या प्रपोजलसंदर्भात एक नवीन माहिती समोर आलीय. चहर जयाला इतक्यात प्रपोज करणार नव्हता पण चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला प्रपोज करण्यासंदर्भातील सल्ला दिल्याचे समजते.

आयपीएलच्या प्लेऑफच्या सामन्यांदरम्यान चहर जयाला प्रपोज करणार होता. मात्र धोनीने चहरला प्लेऑफचे सामने सुरु होण्याआधीच तिला प्रपोज कर असा सल्ला दिला. साखळी सामन्यांमधील चेन्नईच्या शेवटच्या सामन्यानंतर तू तिला प्रपोज करं असं धोनीने चहरला सुचवलं. धोनीच्या या सल्ल्यानंतरच चहरने आपला प्लेऑफच्या सामन्यांदरम्यान जयाला प्रपोज करण्याचा प्लॅन बदलला. सामन्यानंतर बक्षीस वितरण संमारभाच्या आधी दीपक स्टँड्समध्ये गेला, आणि त्याने प्रेक्षकांसमोर जया भारद्वाज हिला प्रपोज केले.

चहरची प्रेयसी ही दिल्लीची आहे. ती तेथील एका कॉर्परेट कंपनीमध्ये काम करते. जया ही बिग बॉसच्या पाचव्या पर्वामधील स्पर्धक असणाऱ्या सिद्धार्थ भारद्वाजची सख्खी बहीण आहे. जया आणि दीपक गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. यंदाच्या आयपीएलमधील अनेक सामन्यात ती स्टँड्समध्ये बसून सामन्यांचा आनंद घेताना पाहायला मिळाली. दीपक आणि जया आयपीएल २०२१ नंतर घरी परतताच लग्न करू शकतात, असे बोललं जात आहे. या प्रपोजलनंतर चेन्नईच्या संघानेही या दोघांच्या प्रपोजलचं सेलिब्रेशन केक कापून केल्याचं पहायला मिळालं.

दीपकला केकची अंघोळ
सामना संपल्यानंतर जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचा संघ हॉटेलमध्ये परतला तेव्हा या नव्या जोडप्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. हॉटेल लॉबीमध्ये दीपक आणि जयासाठी केक तयार होता. दोघांनी मिळून केक कापला आणि एकमेकांना खाऊ घातला. यानंतर सुरेश रैनाने जयाला बाजूला होण्याचे संकेत दिले. मग धोनीने दीपकला घट्ट पकडले. यानंतर सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि संघातील इतर खेळाडूंनी दीपकला केकमध्ये अंघोळ घातली. त्याचवेळी साक्षी धोनीने जयाला मिठी मारली आणि तिचे अभिनंदन केले. सुरेश रैनाची मुलगी ग्रासिया देखील दीपक आणि जयाचे अभिनंदन करताना दिसली.

पंजाबचा चेन्नईवर विजय
आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाबने चेन्नईला ६ गडी आणि ६ षटके राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने पंजाबला विजयासाठी १३५ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात पंजाबचा कप्तान केएल राहुलने ४२ चेंडूत नाबाद ९८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीत ७ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. या विजयासह पंजाबचे गुणतालिकेत १२ गुण झाले असून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. असे असले तरी साखळी फेरीतील पंजाबचे सर्व सामने संपले असून कोलकाता आणि मुंबई यांचा प्रत्येकी एक सामना उरला आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी सामना गमवल्यास कोलकाता, मुंबई, राजस्थान आणि पंजाबचे प्रत्येकी १२ गुण होतील आणि धावगतीवर चौथ्या संघाची प्लेऑफमध्ये निवड होईल.