WPL 2025 Harmanpreet Kaur vs Sophie Ecclestone Fight: मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर व युपी वॉरिअर्सची सोफी एक्लेस्टोन यांच्यामध्ये डब्ल्यूपीएलच्या सामन्यादरम्यान चांगलीच खडाजंगी झाली. गुरुवारी रात्री रंगलेल्या या सामन्यात प्रकरण इतकं हातघाईवर आलं की पंचांना मध्यस्थी करून दोघींना शांत करावं लागलं. या प्रकरणाची सुरूवात झाली युपी वॉरिअर्स प्रथम फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकाच्या सुरुवातीला. पंच अजितेश अरगळ यांनी षटकांची गती कमी झाल्यामुळे शेवटच्या षटकात फक्त ३ खेळाडू ३० यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी ठेवता येतील असे हरमनला सांगितले. हा निर्णय न रुचल्याने आधी हरमनप्रीतने पंचांशी वाद घातला. त्यांच्या निर्णयावर नापसंती दर्शवली. मुंबईच्या संघातून खेळणारी अमिलिया कर हिलाही हा निर्णय पटला नाही व तीही हरमनची बाजू घेत पंचांशी बोलायला लागली.

या दरम्यान, नॉन स्ट्राइकर एंडला असलेल्या एक्लेस्टोनलाही आपणही यात मत मांडावं अशी उर्मी आली व तीही या चर्चेत सामील झाली. तिनं तिचं म्हणणं मांडणं हरमनप्रीतला रुचलं नाही व ती एक्लेस्टोनवर तुटून पडली. मग एक्लेस्टोननंही हरमनप्रीतवर तोंडसुख घेतलं. या दोघींमधली खडाजंगी हा प्रेक्षकांच्या करमणुकीचाच विषय ठरला. सामना संपल्यानंतरही या दोघांमधला ऑन स्क्रीन वाद-विवाद चर्चेचा विषय ठरला.

अमिलिया केरचा फायफर म्हणजे ५ बळी व हॅली मॅथ्यूजचं अप्रतिम अर्धशतक या बळावर अखेर मुंबई इंडियन्सनं युपी वॉरिअर्सचा ६ बळी राखत पराभव केला.

या विजयासह मुंबई इंंडियन्सनं गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं असून आत्तापर्यंत झालेल्या एकूण ६ सामन्यांमध्ये ४ विजय व २ पराजयांची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सच्या गुणांची संख्या ८ झाली असून प्ले ऑफमध्ये जाण्याची त्यांची शक्यता आता वाढली आहे.

कशी जिंकली मुंबई?

युपीने दिलेल्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघात मोठा बदल पाहायला मिळाला. फॉर्मात नसलेल्या यस्तिका भाटिया हिच्या जागी अमेलिया केर हिला हिली मॅथ्यूजसह सलामीला पाठवण्यात आले. पण दौन चौकारांसह १० धावा करून अमेलिया बाद झाली. यानंतर हिली आणि नताली यांनी संघासाठी मॅचविनिंग भागीदारी रचली. हिली मॅथ्यूजने ४६ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची शानदार खेळी केली. तर ऑरेंज कॅप असलेल्या नताली स्किव्हर ब्रंट हिने २३ चेंडूत ७ चौकारांसह ३७ धावा केल्या.

यानंतर हरमनप्रीत कौर ४ धावा करून बाद झाल्यानंतर अमनज्योत कौर हिने १२ धावा आणि यस्तिका भाटिया हिने १० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. युपीकडून ग्रेस हॅरिसने २ विकेट्स तर शनेल हेनरी आणि क्रांती गौड यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

Story img Loader