India vs South Africa 3rd ODI Match Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (२१ डिसेंबर) खेळवला जात आहे. पार्ल येथील बोलंड पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने संजू सॅमसनने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर ५० षटकांत ८ गडी गमावून २९६ धावा केल्या. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेसमोर २९७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
संजू सॅमसनने सावरला टीम इंडियाचा डाव –
दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन करताना संजू सॅमसनने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ४४व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे. संजू सॅमसनने ११४ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि ३ षटकारंच्या मदतीने १०८ धावा केल्या. लिझाद विल्यमसनच्या चेंडूवर संजू रीझा हेंड्रिक्सकरवी झेलबाद झाला.
संजू सॅमसनने पदभार कर्णधार केएल राहुल (२१) सोबत ५० धावांची भागीदारी केली. एकूण १०१ धावांवर केएल राहुल विआन मुल्डरने बाद केला. यानंतर तिलक वर्मासह संजूने डावाची धुरा सांभाळली. संजू आणि तिलक यांच्यात १३५ चेंडूत ११६ धावांची भागीदारी झाली. तिलक वर्मा (५२) संघाच्या २१७६ धावा असताना बाद झाला. त्याला केशव महाराजने बाद केले.
हेही वाचा – IND vs SA : शुबमन गिलने शतक तर यशस्वी जैस्वालने झळकावले अर्धशतक, कसोटी मालिकेपूर्वी भारताची जोरदार तयारी
रिंकू सिंगने आपल्या शैलीत धावा काढल्या. २७ चेंडूत ३८ धावांची इनिंग खेळून तो बाद झाला. रिंकूसोबत वॉशिंग्टन सुंदरनेही शानदार इनिंग खेळली आणि तो ९ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने ५० षटकात ८ विकेट गमावून २९६ धावा केल्या. खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेता ही विजयी धावसंख्या मानली जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून बुरेन हेंड्रिक्सने तीन तर नांद्रे बर्गरने दोन बळी घेतले. लिझार्ड विल्यम्स, व्हियान मुल्डर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.