१०२ कसोटी सामने, ५२०० धावा, १४ शतके. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५२८ बळी. इंग्लंडचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांची ही कारकीर्द आहे. इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूने गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघासाठी अनेक सामने जिंकले, पण ते अनेक वादातही अडकले. आजचा दिवस बोथम यांच्यासाठी खूप खास आहे, कारण ३२ वर्षांपूर्वी २१ ऑगस्ट रोजी बोथम यांनी बंदीनंतर पुनरागमन केले. या पुनरागमनात त्यांनी विश्वविक्रम रचला. इयान बोथम यांच्यावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दोन महिन्यांची बंदी घातली होती. बंदीचे कारण बोथम यांचे गांजा पिणे होते.
१९८६मध्ये इयान बोथम यांनी गांजा पिण्याचे कबूल केले होते, त्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावर दोन महिन्यांची बंदी घातली होती. पण बंदीनंतर २१ ऑगस्ट रोजी बोथम यांनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले. द ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्ध सामना रंगला होता. बोथम यांनी त्यांच्या पहिल्याच चेंडूवर ब्रूस एडगरला बाद केले आणि नंतरच्याच षटकात त्यांनी जेफ क्रोची विकेटही घेतली. या दोन विकेट्ससह ते त्यावेळचे सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडूही ठरले. एवढेच नाही तर बोथम यांनी याच सामन्यात ३६ चेंडूत ५९ धावा केल्या. पावसामुळे हा सामना अनिर्णीत सुटला.
गावसकर आणि बोथम यांचा ‘तो’ किस्सा
इयान बोथम आणि सुनील गावसकर हे दोघे सॉमरसेटमध्ये एकत्र काउंटी क्रिकेट खेळले. बोथम यांनी गंमतीने एक दिवस गावसकर यांच्यावर एक श्वान सोडला. खरे तर, गावसकर श्वानांना खूप घाबरत होते आणि बोथम यांना हे माहीत होते. एक दिवस गावसकर एका फोन बूथवर बोलत होते आणि संधी पाहून बोथम यांनी श्वानाला बूथच्या बाहेर सोडले. गावसकर भीतीपोटी त्याच बूथच्या आत उभे राहिले.
हेही वाचा – Afghanistan Crisis : …अन् सामन्यादरम्यान राशिद खानचं ‘देशप्रेम’ पाहून प्रत्येकानं ठोकला सलाम!
चॅपेल-बोथम वाद
अॅशेस मालिकेमुळे अनेकदा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये संघर्ष व्हायचा. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल आणि बोथम यांची कधीच जमली नाही. १९७६-७७मध्ये इंग्लंड संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता आणि या दरम्यान बोथम आणि इयान चॅपेल यांच्यात भांडण झाले. बोथम यांनी चॅपल यांना बारच्या आत मुक्का मारला आणि नंतर ते त्याच्या मागे गेले. एका आठवड्यानंतर बोथम आणि चॅपेल पुन्हा भिडले. बोथम यांनी चॅपेल यांना काचेच्या ग्लासने चेहरा कापण्याची धमकी दिली.