महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने आजच्याच दिवशी ११ वर्षांपूर्वी इतिहास रचला होता. २ एप्रिल २०११ रोजी मुंबईत खेळल्या गेलेल्या विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला होता. भारत दुसऱ्यांदा क्रिकेटचा विश्वविजेता झाला. या विजेतेपदाच्या सामन्यात गौतम गंभीर आणि एमएस धोनीची विशेष भूमिका होती. अंतिम सामन्यात गंभीरने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. यापूर्वी १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तत्कालीन अजिंक्य वेस्ट इंडिजचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता.
‘असा’ रंगला होता सामना
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना ६ बाद २७४ धावा केल्या. विरोधी संघाकडून महेला जयवर्धनेने १०३ धावांचे शतक झळकावले. त्यांच्याशिवाय कुमार संगकारा ४८, तिलकरत्ने दिलशान ३३, नुवान कुलसेकरा ३२ आणि थिसारा परेराने २२ धावांचे योगदान दिले. या सर्व फलंदाजांच्या सहकार्यामुळे श्रीलंकेचा संघ सन्मानजनक धावसंख्या उभारू शकला. भारताकडून झहीर खान आणि युवराज सिंगने २-२ बळी घेतले. तर हरभजन सिंग एका खेळाडूला बाद करण्यात यशस्वी ठरला.
धोनीचा षटकार
जग जिंकण्यासाठी २७५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि भारताचे खातेही उघडत नसताना पहिली विकेट पडली. सलामीवीर वीरेंद्र सेहवाग एकही धाव न काढता बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गौतम गंभीरने सचिन तेंडुलकरसह डाव पुढे नेला. सचिनने १८ धावांची खेळी खेळली. यानंतर विराट कोहलीला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयश आले. तो ३५ धावा करून बाद झाला. पण पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार एमएस धोनीने कमाल केली, त्याने उत्कृष्ट फलंदाजी करताना ९१ धावांची नाबाद खेळी केली. त्याने गौतम गंभीरसोबत १०९ धावांची भागीदारी करत टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.