* आज अखेरच्या दिवशी कसोटी जिंकण्याचे भारताचे, तर अनिर्णीत राखण्याचे ऑस्ट्रेलियाचे मनसुबे
* मुरलीची शानदार दीडशतकी खेळी आणि कोहलीचे नाबाद अर्धशतक
* चांगल्या सुरुवातीनंतर पडझड झाल्यामुळे भारताकडे ९१ धावांची आघाडी
* उत्तरार्धात भुवनेश्वरने उडवली कांगारूंची दाणादाण
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वर्षभरापूर्वी भारताने पत्करलेल्या ०-४ अशा मानहानीकारक पराभवाची भारत यशस्वीपणे परतफेड करेल, अशीच चिन्हे दिसत आहेत. चौथ्या दिवसअखेर भारताचे कसोटीवरील नियंत्रण पाहून ‘एक ख्वाब.. जीतना है पंजाब’ सोमवारी प्रत्यक्षात अवतरेल आणि भारत मालिकेत ३-० अशी रुबाबात आघाडी घेऊ शकेल. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारत जिंकण्यासाठी, तर ऑस्ट्रेलिया कसोटी अनिर्णीत राखण्यासाठी प्रयत्नशील राहील.
सकाळच्या सत्रात मुरली विजयने (१५३) सलग दुसरे कसोटी शतक साजरे केले, तर भारतीय संघाची एका टोकाला पडझड सुरू असताना विराट कोहलीने (नाबाद ६७) मात्र दुसऱ्या बाजूने एकाकी झुंज दिली. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीची दाणादाण उडवताना तीन झटपट बळी घेतले.
बिनबाद २८९ अशी दमदार सुरुवात करणाऱ्या भारताचा पहिला डाव ४९९ धावांत आटोपला. भारताच्या दहा फलंदाजांना आज फक्त २१० धावांची भर घालता आली. पीटर सिडलने ७१ धावांत भारताचा अर्धा संघ गुंडाळण्याची किमया साधल्यामुळे हे शक्य झाले. त्यामुळे भारताला फक्त ९१ धावांची आघाडी घेता आली. त्यानंतर भारताचा युवा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (२), एड कोवन (८) आणि स्टीव्हन स्मिथ (५) यांना तंबूची वाट दाखवत पाहुण्यांची दिवसअखेर ३ बाद ७५ अशी तारांबळ उडवली. खेळ थांबला तेव्हा फिलिप ह्यजेस आणि नॅथन लिऑन अनुक्रमे ५३ आणि ४ धावांवर खेळत होते. ऑसी संघनायक मायकेल क्लार्क अद्याप मैदानावर उतरलेला नाही. भारत आणि विजय यांच्यामध्ये क्लार्कचाच अडथळा ठरू शकेल.
रविवारी पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व सिद्ध झाले. दिवसभरातील १३ पैकी ८ बळी हे वेगवान गोलंदाजांच्या नावावर होते. सोमवारी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ९८ षटकांत विजय नावावर करण्याचे आव्हान भारतासमोर असेल. ऑस्ट्रेलियाचे उर्वरित सात फलंदाज साध्य होईल अशा धावसंख्येत बाद करून तिसरी कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघ कसोशीने प्रयत्न करेल. चेन्नई आणि हैदराबादमध्ये दणदणीत विजय प्राप्त करून भारताने कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकातील बाहेर जाणाऱ्या तिसऱ्या चेंडूला फटकावण्याचा मोह डेव्हिड वॉर्नरला आवरता आला नाही आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने त्याचा सुरेख झेल टिपला. त्यानंतर एड कोवन पायचीत झाला. मग भुवीच्या लाजवाब चेंडूवर स्मिथची उजवी यष्टी भेदली गेली.
त्याआधी, शिखर धवनचा झंझावात द्विशतकाचे शिखर गाठेल, अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. सकाळच्या सत्रात नॅथन लिऑनच्या गोलंदाजीवर १८७ धावांवर कोवनकडे झेल देऊन तो माघारी परतला, पण विजयने आपली मॅरेथॉन खेळी चालू राखली. तामिळनाडूच्या या शैलीदार फलंदाजाने ३१७ चेंडू आणि ४१४ मिनिटे किल्ला लढवत १९ चौकार आणि तीन षटकारांसह आपली १५३ धावांची खेळी उभारली. विजयचे कसोटी कारकिर्दीतील आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचेही हे तिसरे शतक. सचिनने सुरुवात सावधपणे केली, पण नंतर तो सरावला. मात्र फक्त ३७ धावांची वैयक्तिक खेळी करीत तो तंबूत परतला, पण कोहलीने भारताचा ढासळणारा बुरूज सावरण्यासाठी ७ चौकार आणि एका षटकारानिशी १२९ चेंडूंत आपली अर्धशतकी खेळी साकारली.
क्लार्कच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर
मोहाली : तिसऱ्या कसोटीत पराभव टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाची धडपड सुरू असताना कर्णधार मायकेल क्लार्कची पाठीची दुखापत उफाळून आल्याने कांगारूंसमोरील चिंता अधिकच वाढली आहे. दुखापतीमुळे क्लार्क रविवारी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला नाही. रविवारी रात्री त्याच्या दुखापतीवर उपचार केले जातील, त्यानंतर सोमवारी सकाळी क्लार्कच्या दुखापतीचे स्वरूप लक्षात घेऊन तो फलंदाजीला उतरू शकतो की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
भारताने तिसरी कसोटी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. ही कसोटी अनिर्णीत राखणे ऑस्ट्रेलियाला सोपे जाणार नाही. पहिल्या दिवसापासूनच चेंडू वळत आहे. पाचव्या दिवशी चेंडूला ‘रिव्हर्स स्विंग’ मिळण्याची शक्यता आहे. तसेच चेंडू कोणत्याही क्षणी खाली बसत असल्यामुळे खेळपट्टीवर नांगर टाकणे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसाठी कठीण जाईल. खेळपट्टीचे स्वरूप पाहता भारतीय संघ चांगल्या स्थितीत आहे. चेन्नई कसोटीपासून मी माझ्या फलंदाजीवर भरपूर मेहनत घेत आहे. खेळपट्टीवर जास्तीत जास्त उभे राहण्याचा माझा प्रयत्न असतो.
– मुरली विजय, भारताचा सलामीवीर.
चौथ्या दिवसअखेर
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ४०८
भारत (पहिला डाव) : ४९९
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ३ बाद ७५
सत्र षटके धावा/बळी
पहिले सत्र ३६.१ १०१/३
दुसरे सत्र ३०.५ ९५/४
तिसरे सत्र २८.१ ९५/५
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ४०८
भारत (पहिला डाव) : मुरली विजय पायचीत गो. स्टार्क १५३, शिखर धवन झे. कोवन गो. लिऑन १८७, चेतेश्वर पुजारा पायचीत गो. सिडल १, सचिन तेंडुलकर झे. कोवन गो. स्मिथ ३७, विराट कोहली नाबाद ६७, महेंद्रसिंग धोनी पायचीत गो. स्टार्क ४, रवींद्र जडेजा झे. हॅडिन गो. सिडल ८, आर. अश्विन झे. हॅडिन गो. सिडल ४, भुवनेश्वर कुमार झे. हॅडिन गो. हेन्रिक्स १८, इशांत शर्मा झे. हॅडिन गो. सिडल ०, प्रग्यान ओझा त्रिफळा गो. सिडल १, अवांतर (बाइज ५, लेगबाइज १३, नो बॉल १) १९, एकूण १३२.१ षटकांत सर्व बाद ४९९
बाद क्रम : १-२८९, २-२९२, ३-३८४, ४-४१२, ५-४१६, ६-४२७, ७-४३१, ८-४९२, ९-४९३, १०-४९९.
गोलंदाजी : मिचेल स्टार्क २३-५-७४-२, पीटर सिडल २९.१-९-७१-५, मोझेस हेन्रिक्स १५-१-६२-१, नॅथन लिऑन ३१-४-१२४-१, झेवियर डोहर्टी २४-८-८७-०, स्टीव्हन स्मिथ १०-०-६३-१
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : डेव्हिन वॉर्नर झे. धोनी गो. कुमार २, एड कोवन पायचीत गो. कुमार ८, फिलिप ह्युजेस खेळत आहे ५३, स्टीव्हन स्मिथ त्रिफळा गो. कुमार ५, नॅथन लिऑन खेळत आहे ४, अवांतर (लेगबाइज २, नो बॉल १) ३, एकूण २१ षटकांत ३ बाद ७५
बाद क्रम : १-२, २-३५, ३-५५
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ८-१-२५-३, इशांत शर्मा २-०-११-०, आर. अश्विन ७-२-२५-०, रवींद्र जडेजा २-१-११-०, प्रग्यान ओझा २-१-१-०