फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने अखेरच्या टी-२० सामन्यात बांगलादेशवर मात केली. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. भारतीय संघाच्या या कामगिरीवर कर्णधार रोहित शर्मा खुश असून त्याने या विजयाचं श्रेय गोलंदाजांना दिलं आहे.

अवश्य वाचा – चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला, पंतचा पत्ता कट ! मुंबईकर श्रेयस अय्यरला पसंती

“गोलंदाजांमुळे आम्ही अखेरचा सामना जिंकलो. एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून असं मला बोलावं लागेल असं तुम्हाला वाटू शकेल, पण गोलंदाजांसाठी हे काम किती कठीण होतं याची मला कल्पना आहे. माझ्यासाठी भारतीय संघाचं मालिकेतलं हे सर्वोत्तम पुनरागमन आहे. एका क्षणाला बांगलादेशला ८ षटकात ७० धावा हव्या होत्या, हे आव्हान खरंतर सोपं होतं. पण गोलंदाजांनी टिच्चून मारा करत स्वतःची कामगिरी चोख बजावली. तरुण गोलंदाज जेव्हा चांगली कामगिरी करतात त्यावेळी कर्णधार म्हणून आनंद वाटतो.” अखेरच्या सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रोहित बोलत होता.

यावेळी बोलत असताना रोहित शर्माने श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांच्या फलंदाजीचंही कौतुक केलं. दोन्ही फलंदाजांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७४ धावसंख्येपर्यंत मजल मारली. दरम्यान टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १४ नोव्हेंबरपासून इंदूरच्या होळकर मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

Story img Loader