‘‘मला इतरांचे माहीत नाही, पण ही बातमी ऐकून मला धक्का बसला. या गोष्टीचा बीसीसीआयने कधी विचारही केला नव्हता. आमच्यासाठी ही आकस्मिक घटना आहे. सर्व प्रकरण जाणून घेतल्यावर दोषी खेळाडूंवर काय कारवाई करायची हे आम्ही ठरवू. खेळ स्वच्छ आहे आणि तो स्वच्छ ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. एखाद-दुसऱ्या सडक्या अंडय़ांनी खेळ नासणार नाही,’’ अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी दिली.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना अटक केली असली तरी त्याची पुरेशी माहिती बीसीसीआयकडे नसल्याचे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, ‘‘दिल्ली पोलिसांनी तीन खेळाडूंना अटक केल्याची माहिती माझ्याकडे आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचे म्हटले आहे. पोलिसांकडून काय माहिती मिळते, ते कोणती कारवाई करतात हे पाहून मगच आम्ही कारवाई करू. जर खेळाडू दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, कोणालाही आम्ही पाठीशी घालण्याचा किंवा वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही.’’
गेल्या वर्षी पाच खेळाडू ‘स्पॉट-फिक्सिंग’मध्ये अडकल्यावर बीसीसीआयने त्यांच्यावर कडक कारवाई केली होती. त्याचे उदाहरण देताना श्रीनिवासन म्हणाले की, ‘‘गेल्या वर्षी ‘स्पॉट-फिक्सिंग’मध्ये अडकलेल्या खेळाडूंवर कडक कारवाई केली होती, जेणेकरून ही गोष्ट करण्यासाठी पुन्हा कोणी धजावणार नाही. खेळाडूंना पुरेसा पैसाही मिळतो, त्यामुळे ही खेळाडूंची लालसा आहे.’’
आयपीएलमध्ये खेळाला काळिमा फासणारे प्रकार होत असले तरी ही स्पर्धा बंद करण्याचा विचार नसल्याचे श्रीनिवासन यांनी या वेळी बोलून दाखवले. ते म्हणाले, ‘‘आम्ही लाचलुचपत प्रतिबंध समिती बनवली असून गैरव्यवहार मुळापासून उखडून टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे. एखाद-दुसऱ्या खेळाडूने वाईट प्रकार केल्याने खेळ दूषित होत नाही. दोषी खेळाडूंना आम्ही शिक्षा करूच, पण आयपीएल बंद करणे समर्थनीय नाही.’’

Story img Loader